रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या तक्रारीनंतर शेकाप आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक नामनिर्देशन पत्र छाननी दरम्यान शासकीय कामात व्यत्यय आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
रायगड लोकसभा निवडणूकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्राची ७ एप्रिल २०१४ रोजी झाली होती. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या छाननीच्या वेळी शेकाप आमदार जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. तटकरे यांनी निवडणूकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अपुरी माहीती दिली असल्याचा दावा त्यांनी केला होता. तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नॅशनलीस्ट कॉंग्रेस पार्टीकडून दाखल करण्यात आलेला अवधुत तटकरे यांचा अर्ज अपक्ष न ठरवता डमी ठरवल्याने जोरदार आक्षेप घेतला होता. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेतला होता. या छाननीच्या वेळी घातलेला गोंधळ आता आमदार जयंत पाटील यांच्यासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुमंत भांगे यांनी याप्रकरणी अलिबाग पोलीस स्टेशन मध्ये रितसर तक्रार नोंदवली आहे.
जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या तक्रारीनंतर आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात भादवी कलम १८६ आणि १८९ आंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोठय़ा आवाजात आक्रमकपणे बोलणे आणि शासकीय कामात व्यत्यय आणणे यासारखे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक बेंद्रे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा