देशात H3N2 या इन्फ्लुएंझा व्हायरसचे रूग्ण वाढू लागले आहेत. महाराष्ट्रातही या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी तसंच मास्क वापरावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं महत्त्वाचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. महाराष्ट्रात H3N2 व्हायरसाच फैलाव होतो आहे मात्र घाबरण्याचं काहीही कारण नाही असंही तानाजी सावंत यांनी स्पष्ट केलं.
तानाजी सावंत यांनी नेमकं काय आवाहन जनतेला केलं आहे?
देशभरात इन्फ्लुएंझाचे रूग्ण वाढत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही रूग्ण वाढत आहेत. या व्हायरसचा संसर्ग वाढतो आहे. मात्र काळजीचं काहीही कारण नाही. मी लोकांना हे आवाहन करू इच्छितो की त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. जर लोकांना गर्दीच्या ठिकाणी जायचं असेल तर त्यांनी मास्क आवर्जून लावावा. तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचंही पालन करावं. असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
इनफ्लुएंझा म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने दिलेल्या माहितीनुसार इनफ्लुएंझा व्हायरस चार प्रकारचा असतो A, B, C, D असे चार प्रकार त्यात असतात. त्यातल्या A-B टाइपचे व्हायरस हे वातावरणातल्या बदलांमुळे पसरतात आणि आजारांचा प्रादुर्भाव होतो. इनफ्लुएंझा A हा टाइम महामारीसाठीही ओळखला जातो. या टाइप A चे दोन सबटाइम असतात एक असतो H3N2 आणि दुसरा H1N1. इनफ्लुएंझा टाइम B चे सबटाइप नसतात. टाइप सी हा फारसा गंभीर नाही. तर टाइप डी हा प्राण्यांमध्ये असतो.
ICMR ने दिल्या माहिनुसार गेल्या काही महिन्यांपासून करोनाची प्रकरणं कमी झाली आहेत. मात्र H3N2 प्रकरणं वाढत आहेत. १५ सप्टेंबर नंतर H3N2 ची प्रकरणं वाढली आहेत.
H3N2 ची लक्षणं काय आहेत?
WHO ने दिलेल्या माहितीनुसार H3N2 संक्रमित रूग्णांमध्ये खोकला, कोरडा खोकला, ताप, डोकेदुखी, सांध्यांमध्ये दुखणं, थकवा येणं, गळ्यात खरखर आणि नाक वाहणं ही लक्षणं दिसतात. सुरूवातीला अनेक रूग्णांना ताप येतो त्यानंतर सर्दी, खोकला आणि अंगदुखी तसंच इतर लक्षणं दिसू लागतात असंही WHO ने म्हटलं आहे. तसंच अनेक रूग्णांमध्ये ताप आला पाच ते सात दिवसात बरा होतो पण सर्दी-खोकला बरा व्हायला दोन ते तीन आठवडे जातात.
इन्फ्लुएंझाचा कुणाला जास्त धोका?
इनफ्लुएंझाची लागण कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. मात्र या आजाराचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, म्हातारी माणसं आणि आजारांशी लढणारे रूग्ण यांना जास्त धोका असू शकतो. हा संसर्गजन्य आजार असल्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असा सल्ला WHO ने दिला आहे.
नेमकी काळजी कशी घ्याल?
गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क आवर्जून लावा
आपले डोळे आणि नाक यांना वारंवार स्पर्श करू नका
खोकला आल्यावर किंवा शिंक आल्यावर तोंडावर रूमाल ठेवा
अंगदुखी किंवा ताप आला तर पॅरासिटामोल घ्यावी
नेमकं काय टाळावं?
एकमेकांशी हात मिळवणं शक्यतो टाळावं
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक घेऊन नये
अगदी शेजारी-शेजारी बसून खाऊ नये.