उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लव्ह जिहादची प्रकरणं वाढली असा गंभीर आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. एवढंच नाही तर आज सभागृहात त्यांनी उंबरगाव येथील लव्ह जिहादचा प्रश्नही उपस्थित केला. याबाबत आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.
काय म्हणाले प्रसाद लाड?
सभागृहात आम्ही आज राहुरीतल्या उंबरगावातला प्रश्न उपस्थित केला. २६ जुलै रोजी नगर जिल्ह्यातील उंबरगावची घटना समोर आली आहे. या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे असंही प्रसाद लाड म्हणाले. १० ते १५ अल्पवयीन मुलींना एका ट्युशन टीचरच्या माध्यमातून ट्यूशन दिली जात होती. इर्फान पठाण नावाच्या माणसाला बोलवून संबंधित शिक्षिका या मुलींना बळजबरीने कुराण वाचायला लावत होती. मुस्लिम समाजाचे सण साजरे करायला लावत होती. मुस्लिम समाजाच्या इतर मुलांना बोलवून फोटो काढत होती. फोटो मॉर्फ करुन लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींना ब्लॅकमेल करण्याचं काम सुरु होतं. एका मुलीने हिंमत करुन सगळा प्रकार पालकांना सांगितला.
पोलिसांनी पालकांना मारल्याचीही घटना उघड
पालकांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि सगळे गावकरीही या विरोधात एकत्र आले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. एवढंच काय हिंदू गावकऱ्यांना पोलिसांनीच मारल्याचंही समोर आलं. त्यामुळे मी हा प्रश्न सभागृहात मांडला आणि याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी या प्रश्नी दखल घेऊ कारवाई केली जावी असे निर्देश दिले आहेत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात लव्ह जिहादचे प्रकार वाढले. मागच्या एक वर्षापासून आम्ही या घटना नियंत्रणात कशा आणल्या जातील याकडे लक्ष देत आहोत. तसंच लवकरच लव्ह जिहाद विरोधी कायदाही आणला जाणार आहे असंही प्रसाद लाड यांनी सांगितलं.