जिल्हा दलित अत्याचारग्रस्त घोषित करावा या मागणीसाठी दलित महासंघाने गुरुवारी काढलेल्या आक्रोश मोर्चाला हिंसक वळण लागले होते. काही कार्यकर्त्यांनी साईभक्तांना मारहाण करत, हॉटेल व दुकांनाची मोडतोड करून शहरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याने संयोजकांसह मोडतोड करणाऱ्या सुमारे ३० ते ३५ कार्यकर्त्यांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही.
मोर्चा दरम्यान काही कार्यकर्त्यांनी साईभक्तांना मारहाण केली तसेच नगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या शिवाजी गोंदकर यांच्या हॉटेल छत्रपती कॉम्प्लेक्समधील तीन दुकानांची मोडतोड केली. नगरपंचायतच्या मागील हॉटेल साईसुंदर, हॉटेल गोरोबा यांच्या काचा फोडून नुकसान केले. श्री साईबाबांविषयी अपशब्द वापरल्याने शिर्डीतील ग्रामस्त संतप्त झाले. या विरोधात शुक्रवारी विरोधी मोर्चा काढण्यात आला. शिर्डी पोलीस  स्टेशनवर मोर्चा नेला. या मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, राजेंद्र गोंदकर, शिवाजी गोंदकर आदींनी केले. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना निवेदन देऊन साईभक्तांना मारहाण करणाऱ्या, साईबाबांविषयी अनुद्गार काढणाऱ्या तसेच हॉटेल्स व दुकांनाची मोडतोड करणाऱ्यांवर दंगल व दरोडय़ाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. या घटनेची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिले होते.
याबाबत शिर्डी येथील हॉटेल व्यावसायिक दिलीप अमृतराव गोंदकर यांच्या फिर्यादीवरून आक्रोश मोर्चाच्या संयोजकांसह ३० ते ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम पगारे, सिमोन जगताप, विनायकराव निकाळे, राहुल भडांगे, उमेश शेजवळ, अनिल शेजवळ, नितीन शेजवळ, भास्कर वाघ आदींचा त्यात समावेश आहे.

Story img Loader