सिंधुदुर्गात काजू उद्योग कोटय़वधी रुपयांची आर्थिक उलढाल करत आहे. मात्र काजूवर प्रक्रिया होत असली तरी बोंडू प्रक्रियेअभावी वाया जात आहे. राज्यकर्ते दर वर्षी प्रक्रिया उद्योगाच्या थापा मारण्यात दंग असतात, पण प्रक्रिया उद्योगासाठी पुढाकार घेणाऱ्याना मात्र सहकार्य करत नसल्याचे बोलले जात आहे. या हंगामात काजू बीला १२० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे, तर बोंडू आठ रुपये डबाने गोवा राज्यात नेण्यात येत आहे.काजू प्रक्रिया उद्योगात मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल आहे. सिंधुदुर्गच्या काजू बीला मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने काजू बी खरेदी करून ती सेंद्रिय असल्याने दलाल त्यातून मोठय़ा प्रमाणात उत्पन्न मिळवत असल्याचे बोलले जात आहे.
यंदाचा काजू हंगाम सुरू झाला आहे. बांदा बाजारपेठेत काजू बीला १२० रुपये प्रति किलो भाव मिळाला आहे तर सावंतवाडीत काजू ओला बीला शंभर गर दोनशे पन्नास रुपये विकला जात आहे. यंदा काजू बीला सुरुवातीला चांगला भाव मिळाला आहे.
काजू बी प्रक्रिया उद्योग मोठय़ा प्रमाणात निर्माण होत आहेत पण काजू बोंडू मात्र गोवा राज्यात नेऊन त्यावर प्रक्रिया केली जात आहे. काजू बी आणि बोंडू प्रक्रिया उद्योगात काँग्रेस आघाडी सरकारने १.९ भागभांडवल धोरण जाहीर केले म्हणून दोडामार्गात आनंद तांबूळकर आणि आरोंद्यात कै. विजय आरोंेदेकर यांनी पुढाकार घेऊन सहकार तत्त्वावर प्रकल्प उभारणीसाठी संस्था निर्माण करून पाठपुरावादेखील केला, पण सरकार व प्रशासन पातळीवर त्यांना सहकार्य मिळाले नाही.
काजू बोंडूपासून उच्च प्रतीचे प्रद्यार्क, औषधी द्रव्य बनविले जाते. आज काजू गराला आणि काजू मद्यार्काला मोठी मागणी आहे. गोवा राज्याने काजू बोंडूपासून प्रक्रिया करून मद्यार्क निर्माण केल्याने बोंडू मोठय़ा प्रमाणात गोवा राज्यात नेण्यात येतो.
काजू बी आणि काजू बोंडूपासून शेतकरी वर्गाची आर्थिक बळकटी होऊ शकते, पण सरकार व प्रशासनाने अभ्यास करून धोरण जाहीर करणे अभिप्रेत आहे, पण हल्ली घोषणा भरपूर आणि काम कमी अशी अवस्था असून शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना मात्र नाही.