मराठवाडय़ातील महादेव कोळी, कोळी मल्हार व टोकरे कोळी समाजातील व्यक्तींना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ आठ विद्यार्थी औरंगाबाद येथील जात पडताळणी समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.
गीता वाघमोडे, सोनाली घंटे, संयुजा भालेराव, योगेश घाटे, नीलकंठ घाटे, शिवानंद जमादार, अजय जेजुरे, महेश कोळी या विद्यार्थ्यांचे आई-वडील, काका, बहीण, भाऊ व आत्या या नात्यातल्या व्यक्तींची जात पडताळणी झालेली आहे. तरीदेखील जात पडताळणी समितीचे सहायक आयुक्त भालेराव प्रमाणपत्र देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ करत आहेत. या विरोधात काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाण्याचीही भूमिका घेतली आहे. गीता वाघमोडे ही विद्यार्थिनी सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. जात पडताळणीचा मूळ प्रस्तावही तिने दिला आहे. अन्य आवश्यक कागदपत्रे देऊनही प्रमाणपत्र मिळत नसल्याचे तिने आज सांगितले. नीलकंठ घाटे व अन्य विद्यार्थ्यांची अशीच समस्या आहे. नीलकंठ घाटे याचा भाऊ व्यंकट जगन्नाथ घाटे याचे जात पडताळणी प्रमाणपत्र पूर्वी देण्यात आले होते. त्या आधारे भावालाही प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. संयुजा भालेराव हिच्या वडिलांचा जातीचा दाखला आहे. मात्र, तिला पडताळणी प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. वडिलांची जात पडताळणी झालेली होती. आवश्यक कागदपत्रे देऊनही कार्यवाही केली जात नसल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत.

Story img Loader