कित्येक कुटुंबांना जातीतून बहिष्कृत करून त्यांना जीवन जगणे अवघड करणाऱ्या जोशी (भटके) समाज जात पंचायतीच्या सहा पंचांची शुक्रवारी येथील न्यायालयाने तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली. मागील आठवडय़ात घडलेल्या आंतरजातीय विवाह करणाऱ्या गर्भवती मुलीचा वडिलांनी खून केल्याच्या घटनेशी जात पंचायतीच्या जाचाचा संबंध आहे काय, याची छाननी तपास यंत्रणा करणार आहे. तोंडी फतवे काढून अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या पंचांच्या विरोधात ग्रामीण भागातील कुटुंबांनी तक्रारी दिल्यास पंचायतीच्या म्होरक्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या ‘मुलीला विष पाजून मारा किंवा स्वत: आत्महत्या करा’ असे सांगून वाळीत टाकणाऱ्या येथील जोशी (भटक्या) समाज पंचायतीच्या छळवादाविरोधात मुलीचे वडील अण्णा हिंगमिरे यांनी आवाज उठविल्यानंतर या स्वरूपाच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करत, पंचायतीचे अध्यक्ष भास्कर शिंदे यांसह भीमराव गंगाधर धुमाळ, रामदास बापू धुमाळ, मधुकर बाबूराव कुंभारकर, एकनाथ निळूभाऊ शिंदे, शिवाजी राजू कुंभारकर या पंचांना गुरुवारी अटक केली होती. पोलीस ठाण्यात या पंचांसमोर अनेक कुटुंबांनी आपले गाऱ्हाणे मांडले. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मागील आठवडय़ात शहरातील गंगापूर रस्ता परिसरात गर्भवती मुलीचा वडिलांनी खून केला. वडिलांना या निर्णयाप्रत नेण्यास जात पंचायतीचा निर्णय आणि त्यांच्याकडून केली जाणारी अवहेलना कारणीभूत ठरल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. जात पंचायतीच्या सहा पंचांना शुक्रवारी येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. उपरोक्त खुनाच्या घटनेशी पंचांचा संबंध आहे काय, याची छाननी करण्यासाठी संशयितांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने सहा संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जोशी (भटके) समाज जात पंचायतीचा कारभार विशिष्ट धाटणीने चालतो. प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेला पंचायतीची बैठक होते. त्यात कोणाला जातीतून बाहेर काढायचे आणि कोणाला दंड घेऊन पुन्हा जातीत घ्यायचे हे ठरविले जाते. या जात पंचायतीने गावोगावी आपले पंच नेमले आहेत. त्या त्या गावातील समाज बांधवांच्या हालचालींवर हे पंच लक्ष ठेवतात. बैठकीपूर्वी ही माहिती जिल्ह्यातील मुख्य जात पंचायतीला कळविली जाते. या घडामोडी उघड झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात असे काही प्रकार सुरू आहेत काय, याची छाननी सुरू केली आहे. पंचायतीच्या निर्णयाचा या पद्धतीने बडगा सहन करणाऱ्या कुटुंबांनी तक्रारी देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी केले आहे. या संदर्भात तक्रारी आल्यानंतर तपास यंत्रणेमार्फत त्याची शहानिशा करून पंचायतीच्या म्होरक्यांना हद्दपार केले जाईल, असेही पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.