राज्यात गुटखा बंदी असताना सोलापुरातून शेटफळ (ता. मोहोळ) येथे एका टेम्पोतून नेण्यात येणारा १८ लाख रुपये किमतीचा गुटखा सोलापूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा दुबुले यांनी सावळेश्वर येथे कारवाई करून पकडला. याप्रकरणी शेटफळ येथील संबंधित व्यापाऱ्यासह सातजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिघाजणांना अटकही करण्यात आली आहे.
सोलापुरातून पुणे महामार्गावर शेटफळ येथे गुटख्याचा अवैध साठा नेला जाणार असल्याची माहिती मिळाल्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा दुबुले यांच्या पथकाने सावळेश्वर येथे टोलनाक्यावर सापळ लावला. यात अपेक्षेप्रमाणे एमएच १३-आर ३९४० या क्रमांकाचा आयशर टेम्पो आला असता केलेल्या तपासणीत फळांना पॅकिंग करण्यासाठी लागणाऱ्या कागदाच्या लगद्याखाली दडवून ठेवलेला १८ लाख १४ हजार रुपये किमतीच्या गुटख्याचा साठा आढळून आला. त्यामुळे टेम्पोसह संपूर्ण गुटख्याचा साठा हस्तगत करण्यात आला.
याप्रकरणी गुटख्याचा साठा ज्यांचा होता, ते नाना निवृत्ती चव्हाण, हणमंत ऊर्फ दादा चव्हाण (रा. शेटफळ) यांच्यासह टेम्पोचालक आत्माराम तुकाराम नागणे (रा. सांगोला), क्लीनर अनिस शेख (रा. पंढरपूर), टेम्पोमालक बाळासाहेब आहेरकर (रा. तिरसंगी), साई देसाई व सलीम (रा. हैदराबाद) या सातजणांविरूध्द महाराष्ट्र अन्न व औषध सुरक्षा कायद्यान्वये मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सहायक अन्न व औषध प्रशासन अधिकारी रेणुका पाटील यांनी नोंदविली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मलमे, डी. आर. इनामदार, पोलीस हवालदार खंडागळे, चव्हाण आदींनी भाग घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा