सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी महाबळेश्वर येथील कपिल और धीरज वाधवान यांच्या बंगल्यावर छापा टाकला आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. येस बँकेची हजारो कोटींची फसवणूक आणि अफरातफर केल्याचा वाधवान यांच्यावर आरोप आहे. आज दुपारी सीबीआयचे अधिकारी स्थानिक पोलिसांच्या ताफ्यासह वाधवान यांच्या बांगल्यावर छापा टाकला.
वाधवान यांच्या बंगल्यात करोडो रुपयांची परदेशी पेंटिंग्ज, पोर्ट्रेट, झुंबर असून या अलीशान बंगल्यामध्ये जीम, स्विमींगपूल, संगमरवराचे मंदिर देखील आहे. अधिकाऱ्यांनी सर्व किमती वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. त्याची किंमत कोट्यवधींची असल्याचे सांगण्यात येत आहे. हे साहित्य कुठून आले? कसे आणले? याचा तपास सीबीआयचे अधिकारी करत आहेत. महाबळेश्वर येथील पाच एकर परिसरात वाधवान यांचा हा बंगला आहे.
पहिल्या लॉकडाऊनमध्ये ८ एप्रिल २०२० मध्ये वाधवान बंधूंनी तत्कालीन प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे विशेष पत्र घेऊन कुटुंबातील २१ लोकांसह महाबळेश्वर येथे प्रवेश केला होता. त्यावेळी सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. यानंतर त्यांचा ताबा ईडी आणि सीबीआयला दिला होता. तेव्हापासून वाधवान बंधू ईडीच्या ताब्यात आहेत. यावेळी ईडी व पोलिसांनी वाधवान यांच्या कोट्यवधी रुपयांच्या पाच मोटारी जप्त केल्या होत्या. त्या अजूनही पाचगणी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
शुक्रवारपासून या परिसरात बँकेचे व सीबीआयचे अधिकारी येत होते. याबाबत अधिकची माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी मनाई केली. यावेळी महाबळेश्वर पोलिसांनी या अधिकाऱ्यांना बंदोबस्त पुरविला होता. दीवान हाउसिंग फाइनेंस लिमिटेड (डीएचएफएल) या उद्योग समूहाचे कपिल और धीरज वाधवान प्रमुख असून फसवणुकीच्या गुन्ह्यात सीबीआई आणि ईडीकडून याचा तपास सुरू आहे.