भारतीय व कोकण रेल्वेचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी योजना आणू, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केले. कोकण रेल्वे महामंडळाला ४० कोटी रुपयांपर्यंतची कामे मंजूर करण्याचा अधिकार देण्यात आला आहे, तसेच बचत गटांनी उत्पादित केलेला माल रेल्वेच्या माध्यमातून मार्केटिंग करण्यासाठी प्रयत्न करतानाच सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्य़ात रेल्वेचे पर्मनंट गाईड नेमले जात आहेत, असेही प्रभू म्हणाले.
कणकवली रेल्वे स्थानकावर सरकते जिने, प्रवासी सुविधा वाढ, रेल्वे आरक्षण खिडकी, प्लॅटफॉर्म क्र.१ची रुंदी ६ मीटरपासून १२ मीटर करण्याच्या कामाची सुरुवात तसेच कोकण रेल्वे टोल फ्री आणि बचत गटासाठी ई-पोर्टलचे उद्घाटन सुरेश प्रभूच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, आमदार वैभव नाईक, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार शिवराम दळवी, कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल आदी उपस्थित होते.
कोकण रेल्वेला २५ वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा देण्यासाठी नूतनीकरण करण्यात येईल. त्यासाठी ४० कोटीपर्यंत खर्च करण्याचे अधिकार महामंडळास देण्यात येत आहेत. तसेच कोकण रेल्वे मार्गावर सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात असून, कणकवलीपासून त्याची सुरुवात करण्यात येत आहे. देशभरात भारतीय रेल्वेच्या स्थानकावर सीसी कॅमेरे बसविले जातील, असे ना. सुरेश प्रभू म्हणाले. कोकणी मेवा कोकण रेल्वेत सुरू केला जात आहे. भारतीय रेल्वेच्या सर्व स्थानकांवर पोहचविला जाईल. महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला मार्केटिंग देण्यासाठी कोकण रेल्वे व देशात माल जाण्यासाठी ई-पोर्टल सेवा सुरू करण्यात आली आहे. देशातील आठ हजार स्थानके खासगी उपक्रमातून घेतली जातील पण कणकवली रेल्वे स्थानक नूतनीकरण कोकण रेल्वे करणार आहे, असे ना. सुरेश प्रभू म्हणाले. कोकण रेल्वेने प्रवासी येतात पण त्यांना पर्यटनस्थळी जाण्यास अडथळे येतात म्हणून एक प्रयोग म्हणून कणकवलीतील दहा रिक्षाधारकांना पर्यटन महामंडळाच्या प्रशिक्षणातून रेल्वे टुरिस्ट गाईड बनविले आहेत. रेल्वेतील प्रवासी उतरल्यानंतर पर्यटकांना  माहिती देतील. त्यातून रिक्षाचालकांना आर्थिक फायदा होईल, असा विश्वास ना. प्रभू यांनी व्यक्त केला. कोकणात पर्यटक येतात. त्यात विदेशी पर्यटकही असतील, त्यांच्याशी किमान इंग्रजीत बोलणारे गाईड नेमले जावे, यासाठी रिक्षावाले, टॅक्सीवाले यांची निवड करून पर्यटनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करू, असे सुरेश प्रभू यांनी सांगून रेल्वेचे शिवधनुष्य उचललेले आहे. ते यशस्वितेकडे नेण्याचा प्रयत्न करू, असे सांगताना प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासात कशी क्रांतिकारक पावले टाकली आहेत त्याची माहिती दिली.
माननीय पंतप्रधान ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवून लोकांच्या मानसिकतेत बदल घडविण्याचे मोठे काम करीत असल्याचे ना. प्रभू म्हणाले. कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल यांनी प्रास्ताविक केले.
लोक व सरकारमधील दुवा परिवर्तन केंद्रे ठरू शकतात
सरकारी व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे लोक व सरकारमधील दुवा परिवर्तन केंद्र यांच्या माध्यमातून विकासाचे पाऊल टाकल्यास सर्वागीण विकासाची दालने खुली होऊ शकतात. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून भारताच्या विकासात ठसा उमटविण्याची गरज केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गोपूर आश्रमात व्यक्त केली.
कणकवली-गोपूर आश्रमात जिल्ह्य़ातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधीसमोर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू बोलत होते. त्यांचा व आमदार वैभव नाईक यांचा सत्कार माजी आमदार जयानंद मठकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार नाईक, सामाजिक संस्था अध्यक्ष मोहन होडावडेकर, शेखर सामंत, नकुल पार्सेकर, राजेंद्र मुबरकर, भाजप जिल्हाध्यक्ष योगेश प्रभू, अतुल काळसेकर, माजी आमदार शिवराम दळवी आदी उपस्थित होते.
सरकारी यंत्रणेमार्फत बदल घडविण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतात पण सरकारमध्ये काम करणाऱ्या यंत्रणेकडून अपेक्षित बदल घडत नाहीत, त्यामुळे लोकांच्या  जीवनात बदल घडविणाऱ्या सरकारी यंत्रणेचा दुवा सामाजिक संस्था बनल्यास त्याचा फायदा होतो. त्यासाठी प्रत्येकाने गावागावात आत्मीयतेने काम करण्याची गरज ना. प्रभू यांनी व्यक्त केली.
समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, पर्यावरण, बौद्धिक बदल घडविण्यासाठी लोक व सरकारमधील दुवा परिवर्तन केंद्रे व्हावीत तसेच माणसाच्या जीवनात संस्कारमय विचार यावेत म्हणून प्रत्येक गावात सामाजिक संस्था किंवा परिवर्तन केंद्राच्या माध्यमातून चळवळ उभारल्यास भारताच्या विकासात सामाजिक संस्थांचे कार्य उभे राहील, असे ना. प्रभू म्हणाले.
सरकारी यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे लोकांत नवीन विश्वास निर्माण करण्यासाठी सामाजिक संस्था, परिवर्तन केंद्राची चळवळ उभारली आहे. त्यात लोकांच्या हिताकडे लक्ष देऊन तरुणांनी झोकून द्यावे. त्यामुळे गावागावांत परिवर्तन होईल, असे प्रभू म्हणाले. या वेळी सामाजिक संस्था फेडरेशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी प्रास्ताविक करून सामाजिक संस्थांचे मनोगत व्यक्त केले. या वेळी उमा सुरेश प्रभू यांची उपस्थिती होती.

Story img Loader