दोन दिवसांपूर्वी मुंबईजवळच्यचा वांगणी रेल्वे स्थानकावरचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये पॉइंटमन मयूर शेळके एका लहान मुलाचे रेल्वे रुळावर प्राण वाचवताना दिसत आहे. या बद्दल मयूर शेळकेवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. रेल्वे मंत्रालयानं देखील मयूरच्या या शौर्याला सलाम ठोकत त्याला तब्बल ५० हजार रुपयांचं बक्षिस जाहीर केलं. पण मयूरच्या संवेदनशील मनानं त्याही पुढे एक पाऊल अजून टाकलं. त्याने वाचवलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी मयूरनं बक्षिसाची अर्धी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेटिझन्सकडून पुन्हा एकदा मयूरच्या संवेदनशीलतेवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.

 

काय घडलं होतं त्या दिवशी?

१७ एप्रिल रोजी संध्याकाळई ५ च्या सुमारास मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकावर घडलेला हा प्रकार. स्थानकावर पॉइंटमन म्हणून मयूर ड्युटीवर ड्युटीवर होता. त्याचवेळी एक अंध महिला समोर प्लॅटफॉर्मवर एका लहान मुलासह चालत होती. चालताना मुलाचा तोल जाऊन तो थेट रुळांवर पडला. समोरून एक एक्स्प्रेस वेगाने येत होती. अवघ्या काही क्षणांत तो मुलगा एक्स्प्रेसखाली जाणार असं वाटत असतानाच त्याहून वेगानं मयूर शेळकेनं धाव घेतली. त्यानं मुलाला उचलून प्लॅटफॉर्मवर ठेवलं आणि स्वत: देखील चपळाईनं प्लॅटफॉर्मवर उडी घेतली. अवघ्या काही क्षणांत मयूरनं त्या चिमुकल्याचे प्राण वाचवले!

ही घटना समोर आल्यानंतर मयूर शेळकेचं सर्वच स्तरातून कौतुक केलं गेलं. रेल्वे मंत्रालयाकडून त्याचा सत्कार देखील करण्यात आला. त्याला ५० हजार रुपयांचं बक्षिस देखील जाहीर करण्यात आलं. “मुलासोबतच्या त्या महिलेला दिसत नव्हतं. त्यामुळे तिला काहीही करता येणं शक्य नव्हतं. मी मुलाच्या दिशेने धाव घेतली. पण मला हेही वाटून गेलं की माझ्या जिवाला देखील धोका आहे. पण तरी मला वाटलं की मुलाला वाचवायला हवं. ती महिला खूप भावनिक झाली होती. तिने माझे अनेकदा धन्यवाद देखील मानले. खुद्द रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मला फोन करून माझे आभार मानले”, अशी प्रतिक्रिया मयूरनं दिली.

 

…म्हणून घेतला निर्णय!

पण आता त्यापुढे जाऊन मयूरनं बक्षिसाच्या ५० हजाराच्या रकमेपैकी निम्मी रक्कम म्हणजेच २५ हजार रुपये त्या मुलाच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. “मला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेपैकी अर्धी रक्कम मी त्या मुलासाठी देणार आहे. मला असं समजलंय की त्या मुलाचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला”, असं मयूरनं सांगितलं आहे.

 

मयूरच्या या निर्णयावर देकील नेटिझन्स खूश झाले आहेत. खुद्द विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मयूरचं कौतुक केलं आहे. यासोबतच अनेक नेटिझन्सनी देखील मयूरच्या कार्याचं कौतुक केलं आहे.