लोकसत्ता वार्ताहर
अकोले (अहिल्यानगर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र ग्रंथाचे सामुदायिक वाचन करीत तालुक्यातील राजूर मध्ये शिवजयंती निमित्ताने अभिनव उपक्रम राबविण्यात आला. ‘शककर्ते शिवराय ‘या चरित्र ग्रंथाचा सामुदायिक वाचन सोहळा अकरा दिवस सुरू होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र लोकांपुढे,नवीन पिढीपुढे पोहचावे तसेच नवीन पिढीत वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता असे या उपक्रमाचे संयोजक प्रा संताराम बारवकर यांनी सांगितले.
शिवचरित्राचे अभ्यासक असणाऱ्या मान्यवरांशी चर्चा करून विजयराव देशमुख यांच्या ‘शककर्ते शिवराय’ या अभ्यासपूर्ण आणि विस्तृत संदर्भ असलेल्या दोन खंड असणाऱ्या चरित्र ग्रंथाची वाचनासाठी निवड करण्यात आली. साडेबाराशे पृष्ठे असणाऱ्या या चरित्राची पाचशे रुपये किंमत आहे.वाचनासाठी ग्रंथ उपलब्ध व्हावे या साठी लोकांना आवाहन करण्यात आले .त्याला प्रतिसाद देत लोकांनी एकुण पन्नास ग्रंथ खरेदी केले.सामुदायिक वाचन सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांना वाचनासाठी हे ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले.
८ फेब्रुवारी रोजी या उपक्रमास सुरवात करण्यात आली. राजूर येथील विठ्ठल मंदिरात दररोज सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत शिवचरित्राचे सामुदायिक वाचन होत असे.प्रा.बारावकर जाहीर वाचन करीत.तर सहभागी झालेले त्यांच्या बरोबर वाचनात सहभागी होत.दररोज शंभर ते सव्वाशे पाने वाचण्याचे नियोजन असे.शिवजयंतीच्या दिवशी या वाचन यज्ञाचा समारोप झाला.
डीजे च्या दणदणाट साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला अवास्तव स्वरूप प्राप्त होऊ पाहत आहे.ते कुठेतरी थांबले पाहिजे.तसेच व्हिडीओ सारख्या माध्यमांऐवजी वाचनातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र भावी पिढीपुढे पोहचले पाहिजे असे प्रा बारावकर यांनी सांगितले.
‘खूप छान वाटले.’ही उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दलची बद्दलची त्यांची प्रतिक्रिया.अकरा दिवस आम्ही सर्व जणू महाराजांच्या संपर्कात होतो असे ते म्हणाले.वाचन सोहळ्यानंतर हे सर्व ग्रंथ ग्रंथ खरेदी करणाऱ्यांना देण्यात आले.या निमित्ताने तीस चाळीस घरांमध्ये शिवचरित्र ग्रंथ पोहचला हे ही या उपक्रमाचे एक फलित.
राजूर येथील सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असणारे प्रा बारावकर प्रभावी वक्तेही आहेत.या ग्रंथ वाचनानंतर अन्य लेखकांच्या शिवचरित्र ग्रंथांचा अभ्यास करून तीन दिवसांचा ‘शिव चरित्र कथा’कार्यक्रम सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.पुढील वर्षीच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमपूर्वी असा जाहीर कार्यक्रम करण्याचा त्यांचा निर्धार आहे.