वाई : मराठा समाजाला आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने मांडलेल्या भूमिकेनंतर व आरक्षण मिळाल्याचा
साताऱ्यात जल्लोष करण्यात आला. सातारा शहर व तालुक्यातील मराठा बांधवांनी पोवई नाका येथे फटाक्यांची आतषबाजी केली.
दुपारी शिवसेनेच्या शिंदे गटाच्यावतीने फटाके फोडून सातारी कंदी पेढे वाटून ध्वनीक्षेपकाच्या तालावर नाचून जल्लोष केला. यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला साक्ष ठेवून आरक्षण देण्याची शपथ घेतली होती. मराठ्यांना आरक्षण देणार सांगून ती त्यांनी पूर्ण केली. जो शब्द दिला होता तो मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केला असे त्यांनी सांगितले.
सातारा येथे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोवई नाक्यावरील शिवतीर्थ येथे सकाळीच गुलालाची उधळण करून मोठा जल्लोष केला. त्यात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. फटाक्यांची आतषबाजी करत मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यापारी संघटनेचे सहभागी झाले होते. वाईच्या छत्रपती शिवाजी चौकात फटाके फोडण्यात आले. जिलेबीचे वाटप करण्यात आले. एकूणच सातारा जिल्ह्यात सातारा, वाई, मेढा, कोरेगाव, महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा, लोणंद येथे मोठा जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यात जल्लोषी आणि उत्साहाचे वातावरण होते.