मोहनीराज लहाडे
दशवार्षिक जनगणनेसाठी प्रगणकांना यंदा मोबाईल अॅप उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. अॅपचा वापर करुन जनगणना करणाऱ्यांना अधिक मानधन मिळणार आहे, तर कागदपत्रांवरील नमुन्यात नोंदी करणाऱ्या प्रगणकांना कमी मानधन दिले जाणार आहे. या शिवाय प्रगणक प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन नोंदी करतो की नाही, याची पडताळणी विशेष ‘पोर्टल’मार्फत केली जाणार आहे. यंदाच्या जनगणनेत कुटुंबाकडील इंटरनेट, लॅपटॉप, स्मार्ट फोन याची प्रथमच नोंद होणार आहे, याशिवाय कुटुंब कोणते धान्य सेवन करते, याचीही स्वतंत्र नोंद केली जाणार आहे. ही जनगणना दोन टप्प्यात होणार आहे.
जनगणनेची पूर्वतयारी प्रशासनाच्या पातळीवर सुरु झाली आहे. यंदाची दशवार्षिक जनगणना प्रत्यक्षात ९ फेब्रुवारी २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत होणार असली तरी त्यापूर्वी १ मे ते २० मे २०२० या कालावधीत जनगणनेतील कुटुंबाची घरयादी तयार केली जाणार आहे. प्रगणक म्हणून प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. घरयादी तयार करताना एका प्रगणक गटाकडे १५० ते २०० कुटुंबे, म्हणजे ६५० ते ७०० लोकसंख्या राहील, अशी रचना केली जाणार आहे. एका गटावर पाच ते सहा पर्यवेक्षक नियुक्त केले जाणार आहेत. हे प्रगणक कुटुंबाची यादी तयार करण्यापूर्वी त्यांना दिलेल्या भागाचा नकाशा तयार करतील. त्याच्या मोजणीची सुरुवात वायव्य दिशेने (उत्तर व पश्चिम यांच्यामधील) होईल व नागमोडी (झिगझ्ॉग) पद्धतीने इमारतींना क्रमांक देऊन आग्नेय दिशेला (दक्षिण व पूर्व यांच्यामधील) त्याचा समारोप करतील.
त्याआधारावर कुटुंबपत्रक व कुटुंबयादी तयार केली जाणार आहे. यातील माहिती कुटुंब प्रमुखाकडून घेतली जाणार आहे, तो उपलब्ध नसल्यास जो माहिती देणारा आहे, त्याचे कुटुंबप्रमुखाशी नाते कोणते याची नोंद केली जाणार आहे. त्यात कुटुंब प्रमुखाचे नाव, कुटुंबातील सदस्य, लिंग, घराची सद्य:स्थिती, खोल्यांची संख्या, घरातील सोयीसुविधा, पिण्याचे पाणी, शौचालय, सांडपाण्याची व्यवस्था, स्वयंपाकाची साधने, अनुसूचित जात की जमातीचा की इतर, मालमत्ता काय आहे (रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, लॅपटॉप, फोन, मोबाईल, कार, जीप, मोटरसायकल, सायकल) याशिवाय खाण्याचे धान्य कोणते, मोबाईल क्रमांक, कुटुंबाच्या यादीत प्रमुखाचे व सदस्यांचे नाव, वैवाहिक स्थिती, लिंग, जन्मस्थान, राष्ट्रीयत्व, शैक्षणिक योग्यता, मातृभाषा, जन्मापासून तेथेच राहतात का, आदींची नोंद केली जाणार आहे.
सध्या या जनगणनेची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वतयारी सुरु आहे. उपजिल्हाधिकारी चंद्रशेखर देशमुख, मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी आडसुळ व जामखेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी खैरे यांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पूर्वतयारीची माहिती उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. हे मास्टर ट्रेनर व क्षेत्रीय अधिकारी प्रशिक्षणाचा कार्यक्रम २५ एप्रिलपर्यंत पूर्ण करणार आहेत.
मोबाईल अॅपद्वारे नोंदी करणाऱ्या प्रगणकांना अधिक मानधन
दुसऱ्या टप्प्यात ९ ते २८ फेब्रुवारी दरम्यान घरोघरी जाऊन प्रत्यक्ष जनगणना केली जाणार आहे. ती ‘डिजिटल मोड’वर (मोबाईल अॅप) केली जाणार आहे.त्यासाठी पोर्टल (सेन्सस मॅनेजमेंट मॉनिटरिंग सिस्टिम) तयार करण्यात आले आहे. या डिजिटल मोडवर नोंदी केल्यास प्रगणकाला २२ हजार ५०० रु. तर कागदावर माहितीच्या नोंदी घेतल्यास १५ हजार रु. मानधन दिले जाणार आहे. प्रगणकाने त्याने जनगणना करावयाचा हाताने तयार केलेला व डिजिटल नकाशा तयार करायचा आहे. काम पूर्ण होईल तसे टप्प्याटप्प्याने प्रगणकाला मानधन दिले जाणार आहे.