शंभर दिवसांत परदेशातील काळा पैसा परत आणू, असे आश्वासन दिलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार त्यात अपयशी ठरले आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.
धनवटे नॅशनल कॉलेजमधील कार्यक्रमाच्या निमित्ताने ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. प्रारंभी केंद्र सरकारने काळा पैशाच्या यादीतील लोकांची नावे सांगण्यास नकार दिला. त्यानंतर सांगितले, पूर्वीच्या सरकारने करून ठेवलेल्या करारांमुळे काळा पैसा परत आणण्यास वेळ लागतो. कुठलीही गोष्ट जबाबदारीने पूर्णत्वास नेण्यास अडचणी येतात. या अडचणींची केंद्र सरकारला पूर्वकल्पना असताना मग त्यांनी शंभर दिवसांत काळा पैसा परत आणण्याचे खोटे आश्वासन जनतेला का दिले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हा पैसा परत आणला तर देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. त्यामुळे काळा पैसा परत आणण्यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठवले. त्यावर केंद्र सरकारकडून अण्णा तुमचे पत्र मिळाले, आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे दोन ओळींचे पत्र मला आले.
विदर्भातील शेतकरी आत्महत्यांवर बोलताना अण्णा म्हणाले, स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही शेतकरी आत्महत्या होणे अतिशय दुर्दैवी आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांनी अभ्यासाअंती केंद्राला पिकांचा गुंतवणूक खर्चनिहाय भाव पाठवलेला असताना केंद्र सरकार त्यातही काटछाट करीत असते. दिल्ली. पंजाब, कोलकाता, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि विदर्भ या ठिकाणी दौरे करून शेतक ऱ्यांच्या भेटी घेऊन देशभर शेतक ऱ्यांसाठी आंदोलन उभे करणार आहे. शिवाय, आता ‘राइट टू एज्युकेशन’ आणि ‘राइट टू रिकॉल’ या दोन गोष्टींसाठी आंदोलन करणार आहे.
तरुणांचा पूर्वी होता तसा प्रतिसाद मिळत नाही त्याचे दु:ख नाही. अरविंद केजरीवाल यांच्यामुळे तुमचे नुकसान झाले का, असे विचारले असता अण्णांनी त्या विषयावर मात्र काही बोलणार नसल्याचे सांगितले.
‘मुख्यमंत्र्यांकडे काम करण्याची क्षमता’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय चांगले असून त्यांच्यात काम करण्याची क्षमता आहे. त्यांच्यावर असलेला रिमोट कंट्रोल हटल्यास ते अधिक चांगल्या प्रकारे राज्याचा विकास करू शकतील. मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने राज्याचे ‘हेडमास्तर’ ठरतील, असा विश्वास हजारे यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा