माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची त्रिसदस्यीय समिती पुण्यात आली असून शुक्रवारी सकाळी ही समिती संस्थेस भेट देणार आहे. माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर दीड महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांची झालेली चर्चा असफल ठरल्यानंतर मंत्रालयाच्या प्रतिनिधींचा विद्यार्थ्यांशी प्रथमच थेट संवाद होणार आहे. संस्थेतील तणावपूर्ण वातावरण निवळण्यासाठी या चर्चेचा फायदा होणार का, ही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
केंद्राच्या या समितीत ‘ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया’चे महासंचालक एस. एम. खान, चित्रपट विभागाच्या संचालक अंशू सिन्हा आणि अंतर्गत सचिव एस. नागनाथन यांचा समावेश आहे. विद्यार्थी आणि संचालकांबरोबरच ही समिती संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशीही बोलणार असल्याचे समजते. आतापर्यंतच्या घडामोडींवरुन या सर्व गटांच्या एकमेकांबद्दलच्या भूमिका भिन्न असल्याचे दिसून येते. संचालक प्रशांत पाठराबे यांनी या विद्यार्थ्यांच्या अजूनही अपूर्ण राहिलेल्या चित्रपट प्रकल्पांच्या मूल्यमापनाचा निर्णय जाहीर केल्यानंतर संचालक आणि विद्यार्थी यांच्यात वाद पेटला आणि संस्थेतील शिक्षक संघटनेने या वादात विद्यार्थ्यांच्या बाजूने कौल दिला. काही दिवसांपूर्वी संस्थेच्या चार आजी-माजी कर्मचाऱ्यांनी ‘सेव्ह एफटीआयआय’ या नावाने स्थापन केलेल्या व्यासपीठावरुन विद्यार्थ्यांच्या विरोधात मांडलेली भूमिका आणि नंतर आजी कर्मचारी संजय चांदेकर यांनी विद्यार्थ्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्य़ाचे प्रकरण देखील गाजले आहे.
केंद्राची समिती आज ‘एफटीआयआय’मध्ये
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची त्रिसदस्यीय समिती पुण्यात आली असून शुक्रवारी सकाळी ही समिती संस्थेस भेट देणार आहे.
First published on: 21-08-2015 at 06:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Centers committee meet ftii students