पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बसचा रायगडमधील खोपोली येथील बोरघाटात आज (१५ एप्रिल) पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात १३ मुंबईकरांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी आहेत. या अपघातनंतर मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींसाठी राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली. आता केंद्र सरकारनेही नुकसानभरपाई जाहीर केली आहे. त्यानुसार, केंद्र सरकार पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीअंतर्गत मृतांच्या नातेवाईंकासाठी २ लाख आणि जखमींसाठी ५० हजारांची मदत देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भातील ट्वीट केलं आहे.
हेही वाचा >> VIDEO : “वाहन चालकाला बस हळू चालवण्याबाबत हटकलं, पण…”, जखमी तरुणाने मुख्यमंत्र्यांना सांगितली आपबिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्वीट करत रायगडमधील अपघाताबाबत शोक व्यक्त केला. “महाराष्ट्रात रायगड येथे झालेल्या बस दुर्घटनेने व्यथित झालो आहे.या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.अपघातात जखमी झालेले लवकर बरे होतील अशी मी आशा व्यक्त करतो.अपघातग्रस्तांना राज्य सरकार शक्य ती सर्व मदत करत आहे. रायगड अपघातातील मयतांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफमधून रु.2 लाख आणि जखमींना रु. 50,000 अशी मदत पुरवण्यात येईल”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमार्फत दिली.
राज्य सरकारकडूनही मदत
राज्य सरकारकडूनही नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली. “मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतला आहे. सर्व जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालय व एमजीएम हॉस्पिटल येथे तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचारासाठी स्थानिक प्रशासन समन्वय ठेवून आहेत. जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी राज्य सरकार सातत्याने संपर्कात आहे. या खाजगी बसमध्ये बाजीप्रभू ढोल पथक, गोरेगाव (मुंबई) येथील सदस्य होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. दरीतील बस बाहेर काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकार या कुटुंबियांच्या पाठीशी आहे”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
अपघात कसा घडला?
मुंबईच्या गोरेगावमधील बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) हे पुण्याला एक कार्यक्रम करण्यासाठी गेले होते.पुण्याहून परत येत असताना त्यांच्या बसला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाला. शिंगरोबा मंदिराच्या अलिकडील घाटात ही बस बाजूच्या दरीत कोसळली.पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रायगडच्या खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.
“घाट परिसर असल्यामुळे उतार खूप जास्त आहे. गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालेला असण्याची शक्यता आहे.बसमध्ये एकूण ४१ प्रवासी होते.त्यातील २७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. इतरांना वर काढण्याचं काम चालू आहे. बचावकार्यात खोपोलीतील पथक, खंडाळ्यातील पथक, स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस यांनी महत्त्वाची मदत उपलब्ध करून दिली.आमच्या माहितीनुसार १३ जण दगावले आहेत”, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली आहे.