जनशक्तीच्या रेटय़ामुळेच केंद्र सरकारला सिटीझन चार्टरचा कायदा संमत करावा लागला असा दावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्घीत पत्रकारांशी बोलताना केला.सिटीझन चार्टर विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर हे विधेयक आता संसदेत संमत होऊन राष्ट्रपतींच्या सहीनंतर हा कायदा अस्तित्वात येईल. हजारे यांनी रामलीला मैदानावर केलेल्या उपोषणाप्रसंगी सिटीझन चार्टर कायदा करण्याचे लेखी आश्वासन पंतप्रधानांनी दिले होते.
हजारे म्हणाले, सशक्त जनलोकपाल विधेयकाच्या प्रमुख मागणीसह सर्व श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना लोकपालच्या कार्यकक्षेत आणावे व राज्यात सशक्त लोकआयुक्त नियुक्त करण्यासाठी रामलीला मैदानावर उपोषण करण्यात आले होते. जनेतेचा रेटा पाहून पंतप्रधानांनी तीनही मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. तीन पैकी एक मागणी मंजूर झाल्याने आता नागरिकांना कोणत्याही कामासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. सध्या प्रत्येक कामासाठी पैसे मोजावे लागतात. यापुढील काळात कोणतेही काम ठराविक कालावधीत पूर्ण न झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याने सामान्य जनतेला नक्कीच दिलासा मिळेल.
पहिला मुद्दा कॅबिनेटमध्ये मंजूर झाला असला तरी आणखी दोन मुद्दे शिल्लक आहेत. त्यासाठी आपल्या आगामी कर्नाटक, पंजाब, हरियाणा, राजस्थान आदी राज्यांच्या दौऱ्यात जनजागृती करणार आहोत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत आपला हा दौरा सुरूच राहणार आहे. जनजागृतीमुळे लोक संघटित होतील, मात्र गरज पडल्यास लोकसभा निवडणुकी दरम्यान याच मागण्यांसाठी रामलीला मैदानावर पुन्हा उपोषण करण्याचा इशाराही हजारे यांनी दिला.

Story img Loader