मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. संबंधित दोन्ही शहरांचं नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. आज अखेर केंद्र सरकारने दोन्ही शहरांचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. या निर्णयाचं स्वागत करत देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने करून दाखवलं, असंही फडणवीस ट्विटमध्ये म्हणाले.

हेही वाचा- उस्मानाबाद मतदारसंघात भाजपची मोर्चेबांधणी

खरं तर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं होतं. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशिव’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

हेही वाचा- येत्या दोन दिवसात पुन्हा राजकीय भूकंप होणार? २० आमदारांबाबत उदय सामंत यांचं मोठं विधान!

पण राज्यात सत्तांतर घडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळाने मंजूर केलेल्या प्रस्तावाला स्थगिती दिली. औरंगाबाद शहराचं नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं नामकरण ‘धाराशिव’ करण्याचा नवा प्रस्ताव मंजूर केला. यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. अखेर आज या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central govt approved proposal of changing name aurangabad to chhatrapati sambhajinagar and osmanabad as dharashiv rmm