शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरे गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल केला. डबल इंजिनचं सरकार फक्त हवेत वाफा सोडतंय असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून उद्धव ठाकरेंच्या भूमिकांवर भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. यासंदर्भात मुंबईत माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, पालघरमधील घटनेचा उल्लेख करून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. “केंद्रात हिंदूत्ववादी विचारांचे सरकार असतानाही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदूंना आक्रोश करावा लागत आहे. आक्रोश मोर्चे निघत आहेत. हिंदूंची फसगत झाली आहे. केंद्रातील भाजपा सरकार देश चालवायला लायक नाही हेच त्यावरून स्पष्ट होते. डबल इंजिन सरकार केवळ हवेतच वाफा सोडत असून राज्यातही गद्दार आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या भाजपच्या छाताडावर पुन्हा भगवा फडकावणारच”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“उद्धवजी, आत्ता पश्चात्ताप करून काय फायदा?”

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अडीच वर्षं जो व्यक्ती आपल्या घरातच बंद राहिला, आपल्या कार्यकर्त्यांनाही भेटला नाही, जो कोविडच्या भीतीने आपल्या घरातून बाहेरच पडला नाही, त्यांना सत्तेतून बाहेर करण्याचं काम त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं. जनतेनं केलं. त्यांनी आपली विचारसरणी सोडून अशा विचारसरणीला जवळ केलं तिला बाळासाहेब ठाकरे नेहमीच विरोध करत होते. त्यामुळे हा दिवस तर त्यांना बघायचाच होता. आता पश्चात्ताप करून काय फायदा?” असा सवाल अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

‘हिंदूत्ववादी सरकार असूनही देशात हिंदूंचा आक्रोश’, उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला

“आता तरी सत्याचा सामना करा”

“उद्धवजी ठाकरे, आता तरी सत्याचा सामना करा. आख्ख्या जगानं मान्य केलंय की जगातल्या १६० देशांना औषध व लस पोहोचवण्याचं काम भारतानं केलंय. देशात २२० कोटी लसी मोफत देण्याचं काम मोदींनी केलं आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच पुढाकाराने जेव्हा निधीची तरतूद केली गेली, आपल्या वैज्ञानिकांना प्रेरणा दिली गेली, तेव्हा कुठे ही लस तयार झाली. तेव्हा तर तुम्ही खोलीत बसला होतात. घाबरत होता. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला विसरले होता”, असा टोला अनुराग ठाकूर यांनी लगावला आहे.

“उद्धव ठाकरेंनी तर त्या पक्षाशी हातमिळवणी केली, जो देशावरील हल्ल्यानंतर मौन बाळगून होता. मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केला. तुम्ही तर त्यांच्याशी हातमिळवणी केली, ज्यांनी सर्जिकल स्ट्राईकनंतर सैन्याच्या वीर जवानांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं”, असंही ठाकूर म्हणाले.

दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी उद्धव ठाकरेंनी मोदींवर हल्लाबोल केला होता. “कायद्याचे राज्य संपुष्टात येऊन तेथील जनता पिसाळली की काय होते याचे प्रत्यंतर मणिपूरमध्ये येत आहे. मणिपूरवरून पंतप्रधानांवर टीका केल्यानंतर, सूर्यावर थुंकू नका असा इशारा शिंदेंनी दिला. मग, तुमचा हा सूर्य मणिपूरमध्ये का उगवत नाही? तुमच्या सूर्याचे करायचे काय?” असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला होता.

“ज्याच्या सत्ताकाळात साधूंवर हल्ले होतात…”

उद्धव ठाकरेंनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी पालघरमधील साधू हत्याकांडाचा मुद्दा मांडला आहे. “उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात पालघरमध्ये साधूंवर हल्ले झाले, त्यांची हत्या झाली. ज्याच्या सत्ताकाळात साधूसंतांच्या बाबतीत हे असे प्रकार झाले, त्याला तर लाज वाटली पाहिजे”, अशा शब्दांत अनुराग ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central minister anurag thakur slams uddhav thackeray shivsena anniversary speech pmw