राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन बारामती’ला गुरुवारपासून प्रारंभ झाला. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारामती आणि पुण्याचा दौऱ्यावर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी बूथ कार्यकर्त्यांची सासवड येथे बैठक घेतली. या बैठकीनंतर एका कार्यकर्त्याने सीतारामन यांच्याकडे फोटो काढण्याचा आग्रह धरला. मात्र, या मागणीवर सीतारामन चांगल्याच भडकलेल्या दिसल्या.
निर्मला सीतारामन यांनी बारामती मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सासवड येथे बूथ कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीत केंद्रीय योजना लोकांपर्यंत पोहचवा, बाहेरून नोकरी व व्यवसायानिमित्त या मतदार संघात आलेल्या मतदारांना संपर्क करून आपलेसे करा, असे आदेश सीतारामन यांनी कार्यकर्त्यांना दिले.
या बैठकीनंतर ज्या भाजपा कार्यकर्त्याच्या घरी ही बैठक झाली, त्यांच्या कुटुंबाला अर्थमंत्री सीतारमन यांच्यासह एका फोटो काढायचा होता. बैठक झाल्यावर त्या कार्यकर्त्याने सीतारमन यांच्याकडे विनंती केली की, ‘मॅडम आमचं पूर्ण कुटुंब सकाळपासून तुम्हाला भेटण्यासाठी थांबलं आहे. तुमच्यासोबत एक फोटो काढायचा आहे.’ कार्यकर्त्याच्या या मागणीवर निर्मला सीतारमन चांगल्याच भडकल्या. त्यांनी कार्यकर्त्याला झापलं आणि पुढील प्रवासासाठी निघून गेल्या.
हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे… ‘त्या’ फोटोवरून शिवसेनेनं डागली तोफ! म्हणे, “आदित्य ठाकरे..!”
यावरती कार्यकर्त्याने सांगितलं की, ‘माझ्या वडिलांपासून आम्ही भाजपाचे काम करत आहे. त्यामुळे निर्मला सीतारमन यांच्याकडे आम्ही फोटोसाठी आग्रह केला.’ याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.