जो मागच्या जन्मी पाप करतोय तोच साखर कारखाना टाकतोय, असं माझं मत असल्याचं मिश्किल वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. भंडारा जिल्ह्यातील दोन नेत्यांनी मला फसवून देव्हाडा साखर कारखान्याची मिल माझ्या माथी मारली, असं विधान गडकरी यांनी केलं आहे. तत्कालीन भाजपाचे माजी खासदार नाना पटोले व सहकार नेते दादा टिचकुले यांचं नाव न घेता गडकरींनी त्यांना टोला लगावला आहे. ते गोंदियातील महामार्गाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
भंडारा जिल्ह्यातील दोन नेत्यांनी मला फसवून देव्हाडा साखर कारखान्याची मिल माझ्या माथी मारली आहे, असं विधान नितीन गडकरींनी केलं आहे. तत्कालीन भाजपाचे माजी खासदार आणि सध्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व भंडारा जिल्ह्यातील सहकार नेते दिवंगत दादा टिचकुले यांना त्यांनी टोला लगावला आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, मी जे काम हाती घेतो, ते पूर्णत्वास नेतो.आम्ही ६०० कोटी खर्च करून भंडारा जिल्ह्यातील देव्हाडा येथील साखर कारखान्याचा विस्तार करतोय.
साखर व्यवसाय हा बेकार धंदा आहे. पण यात आता उतरलोच आहे, तर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल असंही गडकरी यावेळी म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार प्रफुल पटेल, सुनील मेंढे, आमदार विनोद अग्रवाल, परिणय फुके, मनोहर चंद्रिकापूर आदी मान्यवर उपस्थित होते .