Vijay Rupani on Maharashtra Government Formation : महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून भाजप विधिमंडळ पक्षाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत निवडीची औपचारिकता पार पाडली जाईल. बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली. ते आज मुंबईत दाखल होतील. दरम्यान, विजय रुपाणी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले जात असले तरी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची औपचारिक निवड झाल्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेसाठी महायुतीतर्फे दावा केला जाईल. तत्पूर्वी भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी बुधवारी सकाळी १० वाजता विधान भवनात बैठक होणार आहे. केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत फडणवीस यांची निवड होणे अपेक्षित आहे. याबाबत गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी म्हणाले, “मला वाटतं की सर्वांत मोठा पक्ष भाजपा ठरला आहे. भाजपाचा मुख्यमंत्री बनला तरी एकनाथ शिंदेंना काही हरकत नसेल, असं त्यांनी सांगितलंय. माझी त्यांच्याशी चर्चा झाली नाही. पण मला वाटतं की भाजपाचा मुख्यमंत्री होईल.

खातेवाटपावर आज चर्चा?

शिंदे यांची नाराजी अद्याप दूर झाली नसल्याचे संकेत आहेत. रविवारी साताऱ्याहून ठाण्यात आलेले काळजीवाहू मुख्यमंत्री अद्याप ‘वर्षा’ निवासस्थानी गेलेले नाहीत. ते आजारी असून ठाण्यातील घरी विश्रांती घेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सोमवारीही खातेवाटपाची चर्चा होऊ शकली नाही. आता आज, मंगळवारी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार एकत्र बसून चर्चा करतील, असे सांगितले जात आहे. अजित पवार हे सोमवारी खासगी कार्यक्रमासाठी नवी दिल्लीला गेले असून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> Maharashtra Government Formation Live Updates : “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद द्या”, शिवसेना आग्रहावर ठाम!

आझाद मैदानात शपथविधीची तयारी

बहुमत असलेल्या पक्षाकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आल्यावर शपथविधी समारंभ आयोजित करण्याचे निर्देश राज्यपालांकडून मुख्य सचिव किंवा राजशिष्टाचार विभागाला दिले जातात. मात्र महायुतीकडे मोठे बहुमत असल्याने ही प्रक्रिया होण्याआधीच सोहळ्याची तयारी अनौपचारिकपणे सुरू करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आधीच याची घोषणा करून टीका ओढवून घेतली होती. सोमवारी भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली. मात्र शिवसेनेचे कोणीही नेते मैदानाकडे फिरकलेले नाहीत. तर, आज झालेल्या पाहणीत महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते.