सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने नुकत्याच सरलेल्या २०२४-२५ आर्थिक वर्षात प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीसह इतर माध्यमातून ८३७ कोटी २९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. यात प्रवासी वाहतुकीतून ३७८ कोटी २० लाख तर मालवाहतुकीतून ४२१ कोटी ५६ लाख रुपये अणि तिकीट तपासणीसह इतर माध्यमातून १५ कोटी ५ लाख रूपये उत्पन्नाचा समावेश आहे.
मध्य रेल्वे सोलापूर विभाग भारतीय रेल्वेच्या एकूण जाळ्यात ७३८.५३ किलोमीटर लांबीच्या विस्तार केला आहे. यात सोलापूरसह पुणे, सांगली, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यासह कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ६५ स्थानके आणि सेवा समाविष्ट आहेत. मागील वर्षभरात सोलापूर विभागाने एकूण एक कोटी ८४ लाखांपेक्षा अधिक प्रवाशांना प्रवास सेवा देत ३७८ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. तर मालवाहतुकीच्या माध्यमातून ४२१ कोटी ५६ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. यात प्रामुख्याने सिमेंट, साखर, कोळसा, जीवनावश्यक धान्यमाल आदींची वाहतूक होते.
याशिवाय संपूर्ण वर्षात तिकीट तपासणीत ११ कोटी ८३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. यातून एकूण १० हजार ९८७ तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात येऊन दोन लाख ५१ हजार ३० प्रकरणांमध्ये ११ कोटी ८२ लाख ८६ हजार ९६० रुपये वसूल करण्यात आले. यात तिकीट नसलेले प्रवासी-एक लाख २२ हजार १३१ आणि त्यांच्याकडून मिळालेला महसूल सहा कोटी ६१ लाख १५ हजार तर अनियमित प्रवास करणाऱ्या एक लाख ५५७७ प्रवाशांकडून चार कोटी ७५ लाख ११ हजार ९२१ रुपये वसूल करण्यात आले. रेल्वेत कचरा करणाऱ्या १००३ प्रवाशांकडून दंडापोटी चार लाख २१ हजार ९०० रुपये वसूल झाले. तर निषिद्ध क्षेत्रात धूम्रपान करणाऱ्या १५८ प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून ३१ हजार ६०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. रेल्वे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील व सहायक वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेच्या उत्पन्नवाढीसाठी उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे.