‘काय सांगायचं साहेब, ३ भावांनी २४ एकर जमिनीत गहू, हरभऱ्याचे पीक घेतले होते. पण गारपिटीमुळे समदं पीक बरबाद केलं. आता जगायचं कसं, तुमीच सांगा.. हातातोंडाशी आलेला घास मातीत मिळाला. लेकराबाळांना कसे जगवावे’ ही व्यथा ऐकविताना शेतामध्ये अस्ताव्यस्त पडलेले हरभरे वेचणारी बेगाताई जाधव ही महिला खाली बसूनच ओक्सा-बोक्सी रडू लागली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना ऐकून केंद्रीय पथकही हेलावले. पथकाने या शेतकऱ्यांना धीर देऊन सांत्वन केले.
जिल्ह्यात ५ वेळा झालेल्या गारपिटीचा फटका बसून ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची शुक्रवारी आलेल्या केंद्रीय पथकाचे सदस्य एन. के. कश्मिरा, जगदिश मीना, तसेच जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी पवार यांनी पाहणी केली. पथकाने जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा, सवना व जोडतळा या गावांना भेटी दिल्या. झालेले नुकसान मोठे आहे. पण तुम्हाला निश्चित मदत मिळेल, असाच अहवाल केंद्राकडे सादर करणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या दुखावर पथकाने फुंकर घातली. पथकाने या शेतावर शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकरी विलास जाधव यांनी नुकसानीची माहिती दिली.
पथकाने सवना येथील शिवाजी नायक, दीपक नायक, केशवराव नायक, दत्तराव नायक यांच्या शेतांनाही भेट दिली. दीपक नायक यांचे १ हेक्टर २० आर गव्हाचे पीक उद्ध्वस्त झाले. इतरही शेतकऱ्यांनी या वेळी आपल्या व्यथा मांडल्या. जोडतळा गावातील शेतास भेट देऊन पथकाने माहिती घेतली. या शिवारातच हिरडा व माळहिवरा येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीचीही पाहणी केली.
कश्मिरा यांनी नुकसानीचा अहवाल दोन दिवसांत पाठविला जाणार असून, आज व उद्या (शनिवारी) औरंगाबाद येथे या मुद्यावर बठक होत आहे. त्यानंतर केंद्रीय कृषी विभागाकडे अहवाल सादर करणार असल्याचे शेतकऱ्यांसमोर सांगितले. जिल्हाधिकारी पोयाम यांनी पथकासमोर नुकसानीचा अहवाल सादर केला. जिल्ह्यात ४० हजार ९६७ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. २५ हजार ५६७ हेक्टर पिकांचे नुकसान ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपविभागीय के. ए. तडवी, कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी रवींद्र पवार, तहसीलदार विद्याचरण कडवकर, कृषी विकास अधिकारी कच्छवे आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
लातुरातील बाधित गावांची केंद्रीय पथकाकडून पाहणी
वार्ताहर, लातूर
जिल्हय़ात मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांसह फळबाग, भाजीपाला यांचे मोठे नुकसान झाले. जनावरे दगावली व मनुष्यहानी झाली. केंद्रीय समितीच्या पथकातील सहसंचालक दीनानाथ, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. पालवे यांनी रेणापूर तालुक्यातील तळणी, लातूर तालुक्यातील कोळपा व निलंगा तालुक्यातील मसलगा येथे प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
तळणी येथे तुकाराम येलोले यांच्या द्राक्षबागेची पाहणी करून झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ. शर्मा व डॉ. मोटे यांच्याकडून माहिती घेतली. जोशी यांच्या शेतातील ज्वारी, तर किसन कारंडे यांच्या तूर पिकाच्या नुकसानीची माहिती घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. नुकसानीचा आढावा घेत निवेदन स्वीकारले. कोळपा येथील शिवराज अंबेकर व इतर शेतकऱ्यांच्या शेतात ज्वारी, हरभरा, तूर या पिकांच्या नुकसानीचा पथकाने आढावा घेतला. मसलगा येथील बाबासाहेब पाटील यांच्या शेतातील टरबूज, टोमॅटो व केळी बागेच्या नुकसानीची पाहणी करून संबंधित शेतकरी व कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला.
जिल्हय़ात गारपीट व पावसामुळे किती गावे बाधित झाली, तसेच पिकांच्या नुकसानीचा पथकाने या वेळी आढावा घेतला. घरांचे नुकसान, मनुष्यहानी व मृत जनावरांची माहिती घेऊन केंद्राला अहवाल देणार असल्याचे पथकातील सदस्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एल. गिरी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मेघमाळे, विभागीय कृषी सहसंचालक के. एन. देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे, जि. प.चे कृषी विकास अधिकारी डॉ. मोहन भिसे, तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा