प्रशिक्षणार्थी (प्रोबेशनरी) IAS अधिकारी पूजा खेडकर या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्यामुळे राज्य सरकारने त्यांची बदली केली आहे. इतकंच नाही तर यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जातो आहे. दरम्यान, या आरोपाची चौकशी करण्याठी आता केंद्र सरकारने एकसदस्यीय समितीची स्थापन केली आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पूजा खेडकर यांनी यूपीएससीकडे सादर केलेल्या दृष्टीदोष आणि मानसिक आजारासंदर्भातील प्रतिज्ञापत्राची चौकशी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. यासाठी एक सदस्यीय समितीची स्थापन केली आहे. या समितीला दोन आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!

पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याच्या प्रमाणपत्राचा वापर यूपीएससी परीक्षेत सूट मिळवण्यासाठी केला होता. या परीक्षेत कमी मार्क मिळूनही त्या उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यांना देशभरातून ८४१ क्रमांक मिळाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांचा आजार सिद्ध करण्यासाठी आरोग्य तपासणी करण्यास सांगितले होते. मात्र सहावेळा नोटीस देऊनही खेडकर वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या.

काही दिवसांनी पूजा खेडकर यांनी दुसऱ्याच रुग्णालयात एमआरआय चाचणी अहवाल काढून तो लोकसेवा आयोगाकडे सादर केला. मात्र लोकसेवा आयोगाने हा अहवाल फेटाळून लावला होता. त्यानंतर आयोगाने खेडकर यांच्या नियुक्तीला कॅट (केंद्रीय प्रशासकीय लवाद) मध्ये आव्हान दिले होते. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी खेडकर यांच्याविरोधात निकाल दिला. मात्र काही काळाने त्यांचा एमआरआय अहवाल स्वीकारला गेला आणि त्यांची आयएएस अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती झाली. दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

हेही वाचा – पूजा खेडकरांच्या आईची पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी, म्हणाल्या, “मी सगळ्यांना…”

गैरवर्तनामुळे पूजा खेडकर यांची बदली

पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या गैरवर्तनासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना अहवाल पाठवला होता. यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना एखाद्या व्यक्तीची बदली होण्याची ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Centre goverment formed panel to probe ias puja khedkars disability certificate spb