Chaitanya Maharaj Wadekar : किर्तनकार इंदुरीकर महाराज यांची किर्तन करण्याची पद्धत अनोखी आहे. विनोदाच्या माध्यमातून ते प्रबोधनाचं काम करत असतात. त्यामुळेच ते सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. त्याच प्रमाणे चैतन्य महाराज हेदेखील सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात. त्यांना अटक झाल्यामुळे त्यांची पुन्हा एकदा चर्चा होते आहे. त्यांनी त्यांचा एक चाहता वर्ग तयार केला आहे. त्यांचे रिल्स आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. अटकेमुळे चर्चेत आलेले चैतन्य महाराज कोण आहेत? जाणून घेऊ.

कोण आहेत चैतन्य महाराज?

चैतन्य महाराज वाडेकर असं चैतन्य महाराजांचं नाव आहे. चैतन्य महाराज वाडेकर यांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील भांबोली गावात १७ ऑक्टोबर १९९४ ला झाला. त्यांचं माध्यमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी या ठिकाणी झाला आहे. आळंदी या ठिकाणीच त्यांनी संत साहित्याचं शिक्षण घेतलं. एप्रिल २०२१ मध्ये त्यांचं लग्न झालं. इन्स्टाग्राम आणि युट्युबवर त्यांचे लाखो चाहते आणि अनुयायी आहेत.

हे पण वाचा- प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक, नेमकं काय कारण? वाचा सविस्तर…

चैतन्य महाराज मदालसा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक

चैतन्य महाराज (Chaitanya Maharaj Wadekar) हे मदालसा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या माध्यमातून चैतन्य महाराज वारकरी संत, साहित्याचा प्रचार आणि प्रसार करतात. युवा किर्तनकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांची किर्तन करण्याची खास शैली, तसंच मुद्दा पटवून देण्याची पद्धत या सगळ्यामुळे युवा वर्गात प्रेरणादायी किर्तनकार (Chaitanya Maharaj Wadekar) म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच रिल्स आणि युट्युबवर त्यांचे अनेक फॅन्स आहेत.

चैतन्य वाडेकरांना का अटक करण्यात आली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे परिसरामध्ये चैतन्य महाराज वाडेकर (Chaitanya Maharaj Wadekar) हे राहतात. त्यांच्या घराजवळ एक कंपनी आहे. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या रस्त्यावरून त्यांचे वाद आहेत. बुधवारी रात्री कंपनीत जाणारा रस्ता बेकायदेशीर खोदला. यावेळी त्यांचे इतर एक नातेवाईक आणि दोन बंधू होते. असं तक्रारीत म्हटलं आहे. तसेच कंपनीच्या कंपाउंडचे पत्रे देखील काढले आहेत. अखेर या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक अजित पाटील यांनी म्हाळुंगे पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना अटक केली आहे. चैतन्य महाराज वाडेकर हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते रिल्स देखील बनवतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. त्यांच्या या अटकेमुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.