गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. जगातील सर्वांत उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. ३१ ऑक्टोबर रोजी या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. सध्या सुरु असलेल्या पुतळ्याच्या वादावर ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील पत्र लिहिणारे अरविंद जगताप यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून अरविंद जगताप यांनी लिहिलेले पत्र महाराष्ट्रभर पोहोचली. संवेदनशील लेखणीमुळे मराठी जनसमूहात त्यांनी मानाचं स्थान मिळवलं. सध्या सुरु असलेल्या पुतळ्यांच्या वादानंतर जगताप यांनी लिहिलेली पोस्ट थेट हृदयाला भिडते. ‘एवढ्या धुळीत, उन्हातान्हात, पावसापाण्यात ताटकळत वर्षानुवर्ष उभं राहणं कुणाला आवडेल का? जिवंतपणी आपल्यासाठी प्रचंड हालअपेष्टा सोसलेल्या लोकांना आपण अजूनही फक्त वेदनाच देतोय असं वाटतं,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी सत्य परिस्थिती मांडली आहे, असं मत नेटकऱ्यांनी मांडलं.
एकीकडे अमुक एका व्यक्तीचा पुतळा हवाच असा आपला अट्टहास असतो. यावरून कित्येकदा राजकारणही झालं आहे. मात्र दुसरीकडे अरविंद जगताप यांची ही पोस्ट मात्र सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडत आहे.
अरविंद जगताप यांनी सांगितलं…
दरम्यान, अरविंद जगताप यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना पुतळ्यांची व्यथा मांडणारी ही पोस्ट तीन आठवड्यांपूर्वीची असल्याचे व अनेक वाचक ही पोस्ट सरदार पटेलांच्या पुतळ्यावर असल्याचा गैरसमज करून घेत असल्याचे सांगितले. खरंतर, ही पोस्ट मी त्यावेळी एकंदर सगळ्याच पुतळ्यांची स्थिती दर्शवणारी असल्याचे मांडले होते व त्यावेळी स्टॅलिनचा पुतळा माझ्या डोळ्यासमोर होता असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे उगाच कुणीही गैरसमज करून घेऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.