रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दापोलीतील प्रचाराला प्राधान्य देत दोन दिवसांत घेतलेल्या सात सभांना नागरिकांनी अत्यल्प प्रतिसाद दिला. पक्षासाठी ही परिस्थिती नकारात्मक असली तरी स्वत:च्या उमेदवारीबाबतची वातावरणनिर्मिती करण्यात तटकरे यांना यश आल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र पुढच्या काळात येथील प्रचार यंत्रणा कशा रीतीने राबवायच्या, याबाबत तटकरे नवीन धोरण आखण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांत व्यक्त होते आहे.
मुळात सुनील तटकरे यांची उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची ही पहिलीच वेळ आहे. साहजिकच अनेक भागांत मतदारांसमोर त्यांना नव्याने समोरे जावे लागणार आहे. त्या तुलनेत अनंत गीते हे खूपच अनुभवी आहेत. उत्तर रत्नागिरीतील मतदारांचे २० वष्रे लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या गीते यांची येथील संपर्क, प्रचार यंत्रणांवर चांगलीच पकड आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत रायगड मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर तेथेही त्यांनी संपर्क यंत्रणांच्या मर्यादा यशस्वीपणे वाढवल्या आहेत. प्रभाव साधणारा कार्यकर्ता, प्रचाराचे ठिकाण, स्वपक्षीय नाराज विभाग, प्रतिस्पध्र्याची असंतुष्ट गावं याचा त्यांचा दांडगा अभ्यास झाल्यानेच त्यांनी गेल्या निवडणुकीतही बाजी मारली होती. रोहा विधानसभा मतदारसंघातून गेली अनेक वष्रे विजयी होणाऱ्या सुनील तटकरे यांच्यासाठी मात्र ही लोकसभा मतदारसंघातील परीक्षा नवीन ठरणार आहे.
एकेकाळी रत्नागिरीचे पालकमंत्रीपद भूषवणारे सुनील तटकरे यांचा या विभागातील संपर्क दांडगा असला तरी निवडणुकीच्या िरगणात स्थानिक नेते व कार्यकत्रे कसा प्रतिसाद देतील, याचा त्यांना अजूनही अंदाज नाही. साहजिकच त्याची चाचपणी करण्यासाठी तालुक्यात जास्तीतजास्त सभा घेणे त्यांच्यासाठी गरजेचे होते. त्यातून स्वत:च्या उमेदवारीबाबत वातावरणनिर्मिती अपेक्षित होतीच, पण स्थानिक नेते-कार्यकर्त्यांकडून सभांसाठी मिळणाऱ्या प्रतिसादाचाही कानोसा घेणे शक्य होणार होते. गावागावात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचा दावा करणारे नेते तटकरे यांच्या सभांसाठी गर्दी घडवून आणतील, अशी शक्यता होती. पण अपेक्षित गर्दीचा प्रभाव साधण्यात तटकरे अपयशी ठरले. २० हजार लोकसंख्या असलेल्या हर्णे-पाज या राष्ट्रवादीच्या तथाकथित बालेकिल्ल्यातही तटकरेंच्या सभांना अवघी तीनशेच्या आसपास उपस्थिती होती. साहजिकच सातही सभा गर्दीअभावी फ्लॉपच झाल्या. मात्र पुढच्या टप्प्यात तालुक्यात संपर्क मोहिमा कोणत्या पद्धतीने राबवायच्या, हे ठरवण्याकरिता तटकरे यांच्यासाठी ‘फ्लॉप’ सभांची ही पहिली चाचपणीच महत्त्वाची ठरणार आहे.

Story img Loader