निवडणुकीत काँग्रेसकडून प्रचाराचा स्तर घसरेल, अशा पद्धतीने भाजपवर टीका केली जात आहे. मात्र, स्त्रियांचा अवमान होणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा जशास तसे उत्तर आम्हालाही देता येते हे लक्षात असू द्या, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिला. महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत त्यांच्याशी आमनेसामने चर्चा करण्यास आपण तयार आहोत, असे जाहीर आव्हान त्यांनी दिले.
जिल्हय़ातील जळकोट व मुरूड येथे तावडे यांनी शनिवारी महायुतीच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. उमेदवार डॉ. सुनील गायकवाड, संभाजी पाटील निलंगेकर, रमेश कराड आदी उपस्थित होते. तावडे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या लग्नाचा विषय काढून काँग्रेसची मंडळी प्रचाराचा स्तर खाली नेत आहेत. काँग्रेसच्या मंडळींनी प्रचाराचा स्तर कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. जशास तसे उत्तर देण्याची आमचीही तयारी असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस विकासाचे खोटे चित्र निर्माण करीत आहे. उद्योगधंदे बंद पडत आहेत. बेरोजगारी प्रचंड वाढली. कृषी उत्पन्नाचा महाराष्ट्राचा दर देशात निचांकी आहे. सर्वच पातळीवर महाराष्ट्राचा विकासदर घसरला असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोणत्या तोंडाने महाराष्ट्र गुजरातपेक्षा पुढे आहे असे सांगतात? महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत त्यांच्याशी आमनेसामने चर्चा करण्यास आपण तयार आहोत, असे जाहीर आव्हान तावडे यांनी दिले. तावडे यांच्या दोन्ही सभांना चांगली गर्दी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा