मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पुढील ३ तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) याबाबत रविवारी अॅलर्ट जारी केला होता. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस ‘रेड अॅलर्ट’ जारी करण्यात आला होता, तर मुंबई शहर व उपनगरासाठी चार दिवस ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी केला होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात पडणाऱ्या पावसाचा सोमवारी मात्र जोर वाढलेला दिसला.
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा निर्माण झाल्याने मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाल्याने २० दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सोमवारपासून पुढील ५ दिवस कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
NOWCAST WARNING ISSUED at 1600 Hrs IST DATED 12/7/21
INTENSE SPELLS OF RAINFALL LIKELY TO OCCUR IN THE DISTRICTS OF RAIGAD, RATNAGIRI, SINDHUDURG, PUNE SATARA DURING NEXT 3 HOURS.
-IMD MUMBAI pic.twitter.com/4PpylIsKal— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 12, 2021
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यात रविवार दुपारपासूनच पावसाने जोरदार पाऊस कोसळत आहे. कोकणासह बुलढाणा, अकोला, नांदेड, परभणीमध्ये पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे.
१२ जुलै, कोकण भागात येत्या 5 दिवसा साठी IMD ने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई मध्ये सकाळी 10 वाजल्या पासून अनेक ठिकाणी मुसळधार पाउस होताना दिसत आहे.
कृपया IMD चे अपडेट्स पाहत राहा. pic.twitter.com/gy39CQTd92— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 12, 2021
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्गमध्ये मुसळधार तर देवगड, वैभववाडीत संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी १३२३.९१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
रायगड जिल्ह्यात सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा बसला असून, सरासरी ८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुरुड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, तालुक्यात २४ तासांत तब्बल ३४८ मिलीमीटर पाऊस पडला. अतिवृष्टीमुळे काशिद येथे पूल वाहून गेला असून, या दुर्घटनेत एक वाहन चालक वाहून गेला आहे. त्याचबरोबर राजपूरी आणि कळवटे येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. तर उसरोली नदीलाही पूर आल्याने सुपेगाव मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढल्याने प्रमुख नद्यांमध्ये पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.