चंद्रपूर : दिवाळीत चंद्रपूर शहरातील प्रदूषणात मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषण वाढल्याचे सांगितले जात असले तरी यासाठी औद्योगिक प्रदूषणही कारणीभूत ठरते आहे. दिवाळीच्या रात्री आणि सोमवार, मंगळवारी एमआयडीसी कॅम्पसमधील हवेचा दर्जा निर्देशांक २७० वर पोहोचला. १२ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेचा दर्जा निर्देशांक ४५५ होता.
प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना असतानाही शहर आणि जिल्ह्य़ात मर्यादेपेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडले जात आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषणासोबतच हवेतील प्रदूषणातदेखील वाढ झालेली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार हवेचा दर्जा निर्देशांक ० ते ५० च्या दरम्यान असल्यास तो चांगला, ५० ते १०० संतुलित, १०१ ते १५० संवेदनशील, १५१ ते २०० त्रासदायक आणि २०१ ते ३०० अस्वास्थ्यकर मानले जाते. तसे पाहता, येथील एमआयडीसी संकुलातील उद्योगधंदे, सीएसटीपीएसमध्ये दररोज हजारो मेट्रिक टन कोळसा जाळल्याने चंद्रपूर जिल्ह्य़ाची देशातील सर्वाधिक प्रदूषित जिल्ह्य़ांमध्ये गणना होते.
हेही वाचा >>> उपमुख्यमंत्री अजित पवारानंतर जयंत पाटीलही डेंग्यूग्रस्त, माहिती देत म्हणाले…
वाढत्या वायूप्रदूषणाच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा आवाजाचे फटाके फोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण बंदी घातली असतानाही दिवाळीच्या दिवशी फटाक्यांची विक्री आणि रात्री उशिरापर्यंत फुटलेल्या फटाक्यांमुळे चंद्रपूरच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली.
रात्री आठ ते दहा या वेळेनंतर फटाके फोडण्यावर र्निबध असतानाही फटाके फोडले गेले. याविरोधात कुठेही कारवाई करण्यात आल्याची माहिती नाही. वाढत्या प्रदूषणामुळे त्वचा, श्वसन, हृदयरोग, केस गळणे, दमा तसेच इतर आजार बळावले आहेत.
आयुष्यमानात घट
फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणात वाढ झाली असली तरी या काळात घुग्घुस येथील लॉयड मेटल्स, एसीसी, चंद्रपूर वीज केंद्र यासह जिल्ह्य़ातील इतरही औद्योगिक कारख्यान्यातून प्रदूषणात भर पडली. त्यामुळे चंद्रपूरकरांचे आयुष्यमान कमी होत चालले आहे.