करोनामुळे वारकरी संप्रदायातील तब्बल ६ वारींवर निर्बंध लागू असल्याने रद्द झाल्यानंतर आज माघशुध्द एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढपुरमध्ये दाखल झाले आहेत. माघी वारीचा मुख्य सोहळा म्हणजेच माघी एकादशीनिमित्त साजरा होत असून मराठी वर्षांतील शेवटची आणि वारकरी संप्रदयातील महत्त्वाची मानली जाणारी माघी वारी ही शेवटची असते. या वारीसाठी तळ कोकण, कोकण, मुंबई, मराठवाडा येथून भाविक न चुकता वारीला येतात आणि चंद्रभागेमध्ये स्थान करतात. मात्र यंदा याच चंद्रभागा नदीचं पाणी हे तिर्थ म्हणूनच काय तर अंघोळ करण्यासाठीही धोकादायक असल्याची माहिती समोर आलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अवहालामध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे. हे पाणी तिर्थ म्हणून पिऊ नये असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या गणेश अंकुरराव यांनी केलंय. गणेश यांनीच या पाण्याचे काही नमुने चाचणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल समोर आला असून त्यामधून नदीचं पाणी हे मानवी आरोग्यासाठी धोकायदाक असल्याचा निष्कर्ष समोर आलाय. माघी एकादशीनिमित्त पंढरपुरमध्ये तीन लाखांच्या आसपास भाविक दाखल झालेले असतानाच ही माहिती समोर आल्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय.

चंद्रभागा नदीच्या पाण्यामध्ये शेवाळ, घाण पाणी, आळ्या-किड्या आहेत. तसेच हे पाणी मैलामिश्रीत असल्याचं गणेश अंकुरराव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय. चंद्रभागेच्या पाण्यात गढूळपणा आहे. प्रशासनाच्या दबावापोटी भूजल सर्वेक्षण करण्यात आलंय, असा आरोप अंकुरराव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलाय.

चंद्रभागेमध्ये स्नान करणारे भाविक अंग खाजवत होते. तर काहींना फोड्या आल्या होत्या. आम्ही यासंदर्भात आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र प्रशासन याबद्दल काहीच भूमिका घेताना दिसत नाहीय. माघी वारीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा दर्जा पाहता भाविकांनी नदीमध्ये स्थान करु नये असं आवाहन प्रशासनाने करणं आवश्यक होतं. मात्र प्रशासनाने याकडे पूर्णपणे दूर्लक्ष केल्याचा आरोप गणेश अंकुरराव यांनी केलाय. या माध्यमातून प्रशासन भाविकांच्या जीवाशी खेळत आहे. चंद्रभागा हा भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळेच नदी स्वच्छ व्हावी आणि बदल घडावा यासाठी राज्य शासनाने निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही गणेश अंकुरराव म्हणालेत.

तीर्थ म्हणून चंद्रभागेचं पाणी पिण्यायोग्य नाहीय. त्यामुळेच मी महर्षी वाल्मिकी संघातर्फे सर्व भाविकांना आवाहन करतो की हे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करु नये, असंही गणेश अंकुरराव म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrabhaga river water quality is bad for human health scsg
Show comments