चंद्रकांत बुध्या घाटाळ हे आदिवासी समाजातील खगोल अभ्यासक आहेत. २०१५ साली त्यांनी पालघर जिल्ह्यातील कासा येथे पहिलं अवकाश निरीक्षण केंद्र सुरू केलं. अशाप्रकारचं अवकाश निरीक्षण केंद्र सुरू करणारे ते भारतातील पहिले आदिवासी व्यक्ती असल्याचा त्यांचा दावा आहे. या केंद्रात ग्रामीण भागांतील मुलांना मोठ्या टेलिस्कोप व इतर विज्ञानाच्या साहित्याद्वारे अवकाश निरीक्षण माहिती व प्रशिक्षण अगदी विनामूल्य दिलं जातं. शहरात जाऊन खगोलीय ज्ञान घेणं या मुलांना शक्य नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण इथेच अवकाश निरीक्षण केंद्र तयार करण्याचा निर्णय चंद्रकांत यांनी घेतला.
खगोलशास्त्राविषयी त्यांना लहानपासूनच आकर्षण राहिलं आहे. बी. एडचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईत ते काही काळ नोकरीसाठी होते. मात्र नोकरीत मन रमलं नाही. आपल्या आदिवासी समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे नोकरी सोडून पुन्हा ते आपल्या गावी परतले. आपल्याला आवड असलेल्या खगोलशास्त्राचा अभ्यास सुरू केला. हे खगोलीय ज्ञान केवळ आपल्यापुरताच मर्यादित न ठेवता गावातील या मुलांनाही ते मिळांव या उद्देशाने अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र सुरू केलं. आतापर्यंत शाळा व महाविद्यालयातील जवळपास १० हजार विद्यार्थ्यांनी या केंद्राला भेट दिली आहे. चंद्रकांत यांच्या या कामाचा गौरव पालघर भूषण पुरस्कारानेही करण्यात आला आहे. ‘गोष्ट असामान्यांची’ या लोकसत्ता लाइव्हच्या विशेष मालिकेतील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.