अमरावती पालिका आयुक्त तेरा महिन्यांत मूळ जागी
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अखेर बदली करण्यात आली असून अवघ्या तेरा महिन्यांमध्येच त्यांना त्यांच्या मूळ विभागात म्हणजे, ग्रामविकास आणि जलसंधारण विभागात पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी अपर जिल्हाधिकारी हेमंतकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होताच शहरातील अनेक नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रकांत गुडेवार हे अमरावतीत आयुक्तपदावर कायम रहावेत, या मागणीसाठी येथील राजकमल चौकात स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. हजारो लोकांनी त्यावेळी त्यांना पाठिंबा दिला होता. लगेच दुसऱ्या दिवशी ‘अमरावती बंद’ पुकारण्यात आला, पण या ‘बंद’ला गुडेवार समर्थकांना अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. शहरातील मुख्य बाजारपेठ बंद होती, पण त्यासाठी काही लोकांनी दगडफेकही केली होती. या प्रकाराचे गालबोट या बंदला लागले. सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चंद्रकांत गुडेवार यांना त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू द्यावा, अशी मागणी करणारा ठराव त्यांच्या अनुपस्थितीत मांडण्यात आला खरा, पण तोपर्यंत त्यांच्या बदलीचे आदेश महापालिकेत पोहोचलेले नव्हते. बदलीच झाली नाही, मग चर्चा कशाला हवी, असा आक्षेप घेत ठरावाला विरोध करणाऱ्या काही नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घातला. अखेर चर्चेविनाच सर्वसाधारण सभा गुंडाळावी लागली. या सर्व प्रकारांमुळे गुडेवार यांच्या समर्थनार्थ सरसावलेल्या नगरसेवकांमध्येही शिथिलता आल्याचे दिसून आले. सायंकाळी चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीचे आदेश महापालिकेत धडकताच संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. गुडेवार यांना विरोध करणाऱ्या नगरसेवकांनी शासनाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले, तर अनेक नगरसेवकांनी नाराजी उघड केली. आपल्या धडाकेबाज कारवाईमुळे चंद्रकांत गुडेवार हे चर्चेत आले, पण त्यांनी लोकप्रतिनिधींची नाराजी ओढवून घेतली होती. आमदार डॉ. सुनील देशमुख आणि त्यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता. डॉ. देशमुख यांनी गेल्या मार्चमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या मुद्यावरून गुडेवारांविरोधात विधानसभेत मांडलेला हक्कभंग प्रस्ताव पारितही करण्यात आला होता. त्यांनी जनविकास काँग्रेसचे नगरसेवक आणि डॉ. सुनील देशमुख यांचे निकटस्थ नितीन देशमुख यांच्या हॉटेल रंगोली पर्ल आणि प्रवीण मुंधडा यांच्या हॉटेल महफिलवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी केलेली कारवाई चांगलीच गाजली. अमरावती महापालिकेला बऱ्याच कालावधीनंतर प्रामाणिक, पारदर्शक आणि शिस्तीचा अधिकारी लाभला होता. अडचणींमधून त्यांनी महापालिका सावरली. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था निर्माण केली, पण भाजप-शिवसेनेच्या सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना तिलांजली देत प्रामाणिक अधिकारी परत पाठवला, अशी प्रतिक्रिया नगरसेवक प्रदीप बाजड यांनी दिली. नगरसेवक दिनेश बूब यांनीही सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू द्यायला हवा होता, असे ते म्हणाले.
आज रुजू होणार -गुडेवार
शासनाने आपल्या स्थानांतरणाचे आदेश काढले आहेत. त्याचा आपण स्वीकार करतो. आपण उद्या, मंगळवारी ग्रामविकास विभागात रुजू होणार आहोत. अमरावती सोडण्याचे कुठलेही वैषम्य नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत गुडेवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. आपण आपल्या सेवेत लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पुढेही करीत राहू, असे ते म्हणाले.