दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा, अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. आनंद दिघे यांचा मृत्यू अपघातात झाला नव्हता तर त्यांचा खून झाला होता असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. तसेच ते म्हणाले की, हा खून कोणी केला होता याची चौकशी करावी. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूनही प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा आरोप केला आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले, आनंद दिघे यांचं निधन झालं तेव्हा मी दिल्लीत होतो. त्यानंतर मी आणि राम नाईक आम्ही दिघे साहेबांच्या अत्यंयात्रेला आलो होतो. आम्हाला माहितीपण नव्हती की तिथे कोण होतं. शेवटच्या क्षणी तिथे कोण होतं. तो सगळा संशोधनाचा विषय आहे.
हे ही वाचा >> राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, बरेचसे लोक, शिवसैनिक म्हणतात ते एकनाथ शिंदेंचं कारस्थान असू शकतं. आता त्याची चौकशी केली पाहिजे. दिघे साहेबांबरोबर आम्ही काम केलं आहे. एक जबरदस्त माणूस होता. ते तुरुंगात गेले तेव्हा अगदी शाळकरी मुलांनीदेखील त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता. ते तुरुंगात कसे गेले, तर एका गद्दार नगरसेवकाने शिवसेनेशी गद्दारी केली होती. त्यावेळी शिवसेनेचा महापौर पदाचा उमेदवार होता त्याला त्या नगरसेवकाने पाडलं होतं. एका मताने शिवसेनेचा महापौर होऊ शकला नाही. त्यानंतर दिघे साहेब चिडले. तो माणूस (विरोधात मत देणारा नगरसेवक) संपला नंतर.., दिघे साहेबांना त्यात अटक झाली होती.