शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार गजानन किर्तीकर यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किर्तीकर यांनी शुक्रवारी प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेकडून त्यांची पक्षाच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टीनंतर संजय राऊत, अरविंद सावंत, अंबादास दानवे, किशोरी पेडणेकर यांनी किर्तीकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही किर्तीकर यांचा समाचार घेतला आहे.
“गजानन किर्तीकर हे आमचे मार्गदर्शक आहेत. औरंगाबाद आणि जालन्यासाठी त्यांनी खूप मोठं काम केलं होतं. आम्हाला घडवण्यामागे किर्तीकर यांचा हात आहे. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंबरोबर त्यांनी काम केलं. दोन वेळा खासदार, पाच वेळा आमदार एवढे देऊन सुद्धा गद्दारांबरोबर गेल्याने मला दु:ख झालं,” असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
हेही वाचा : “वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की…”, गजानन किर्तीकर शिंदे गटात गेल्यानंतर अरविंद सावंतांचं टीकास्र!
काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊ नका, असं गजानन किर्तीकरांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यावर खैरे यांनी म्हटलं, “आता सर्वजण हेच बोलत आहेत. मग, ज्यांनी शिवसेना फोडली त्या गद्दारांबरोबर जायचं का? पक्षात राहून मतं मांडायची होती. पण, यावर किर्तीकर कधीच बोलले नाहीत. गेले अडीच वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकार होते, तेव्हाच बोलायचं होते. मात्र, गजानन किर्तीकर म्हातारपणी म्हातारचाळे करायला लागले आहेत,” अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.