आज १८ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. देशातील भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीसह काँग्रेस आणि अनेक विरोधी पक्षांमध्ये निकालाची धाकधूक आहे. महाराष्ट्रातही हिच परिस्थिती आहे. गेल्या २ वर्षांत येथे पक्ष फूट, बंड या सारख्या राजकारण ढवळून काढणाऱ्या घटना घडल्या असून त्याचे जोरदार प्रभाव राज्यातील लोकसभेच्या जागांच्या निकालांवर दिसून येईल असे अंदाज बांधले जात होते. त्यामुळे अनेक पक्षांचे नेते प्रतिक्रिया देताना सावधगिरी बाळगत आहे.
छत्रपती संभाजीनंगर येथून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी देखील निकालाबाबत बोलताना सावध प्रतिक्रिया दिली. टीव्ही ९ मराठीशी बोलताना खैरे यांनी निकाल आपल्याच बाजून असल्याची पूर्ण खात्री झाल्यानंतरच गुलाल उधळणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
जोपर्यंत प्रमाणपत्र हाती येत नाही, तोपर्यंत कोणीही काही करायचे नाही. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर घोषणा होईल त्यानंतर जल्लोष करा, गुलाल उधळा, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली.
सर्व वृत्त वाहिन्यांनी मी आघाडीवर आहे असे म्हटले असले तरी अतिआत्मविश्वास बाळगायचा नाही. मागच्या वेळ झालेली चूक होऊ देणार नाही. दिवसभर मतमोजणी केंद्रावर असणार. उद्धव ठाकरेंबाबद महाराष्ट्रात जबरदस्त वातावरण आहे. त्याचा फायदा होणार. छत्रपती संभाजीनगर हे केवळ बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे. गेल्यावेळी ज्याने हिसकावून घेतला, त्याने काहीच केले नाही, असे खैरे म्हणाले.
हेही वाचा – महाराष्ट्रातल्या पक्षफुटीचा नेमका फायदा कोणाला? सर्वाधिक नुकसान अजित पवारांचं?
भुमरेंचे आव्हाण उपयोगाचे नाही. त्यांनी खूप पैसे वाटले. त्यांनी स्वत:चे पैसे वापरले नाही, त्यांनी खोके घेतले, असा आरोप करत यंदा मतदाना उद्धव ठाकरे यांनाच मिळणार, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला. मात्र विजयावर बोलताना आपण प्रमाणपत्र हाती येईपर्यंत जल्लोष करणार नाही, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा जागेवर खैरे यांचा सामना एमआयएएमचे खासदार इम्तियाज जलील, शिवसेना शिंदे गटाचे संदिपान भुमरे यांच्याशी आहे. या तिघांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. पाणी, मराठी आरक्षण यासारख्या अनेक मुद्द्यांवर ही निवडणूक गाजली. या तिघांपैकी कोणाला विजय मिळतो, हे आता निकालातूनच कळणार.