शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करत जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत, त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलू नये, असे प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान, नाना पटोलेंच्या नाराजी नंतर चंद्रकांत खैरे यांनी आमदारांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “अनिल परबांचे रिसॉर्ट ९० दिवसांत पाडण्यात येईल”, किरीट सोमय्यांचा दावा; म्हणाले, “नऊ सदस्यीय समिती…”

चंद्रकांत खैरेंचे स्पष्टीकरण

“भाजपा काँग्रेसच्या २२ आमदारांना फोडेल, असं मला म्हणायचं नव्हतं. तर भारत छोडो यात्रा सुरू असल्याचे काँग्रेसचे नेते सध्या व्यस्त आहेत. मात्र, भाजपाचे नेते संधीची वाट बघत आहेत. भाजपाकडून देशात फोडा फोडीचं राजकारण सुरू आहे. नाना पटोलेंना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. त्यामुळे माझ्या वक्तव्याने त्यांना दुखं झाले असेल, तर मी त्यांची नाराजी दूर करतो”, असं स्पष्टीकरण चंद्रकांत खैरे यांनी दिले आहे.

हेही वाच – मोरबी दुर्घटना म्हणजे गुजरातमध्ये सत्तापालट होण्याचे संकेत? जयंत पाटलांनी करुन दिली मोदींच्या विधानाची आठवण, म्हणाले…

नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांत खैरे?

ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे २२ आमदार सरकारमध्ये येण्यासाठी तयार असल्याचा दावा केला होता. “देवेंद्र फडणवीस हुशार आहेत. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून त्यांनी आत्तापासूनच काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. यातून ते त्यांचं मुख्यमंत्रीपद मिळवून घेतील. कारण मुख्यंमत्रीपद त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांचा चेहरा किती पडलेला असतो. हे सगळं असताना त्यांचे डावपेच सुरू असतात”, असं वक्तव्य खैरे यांनी केले होते.

हेही वाचा – “राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असा उद्धव ठाकरेंचा अंदाज, गुजरातमध्ये…”; अरविंद सावंतांचं विधान

नाना पटोलेंनी दिले होते प्रत्युत्तर

दरम्यान, चंद्रकांत खैरेंच्या या दाव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले होते. “जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलण्याचं काही कारण नाही. ज्यांना आपलाच पक्ष सत्तेमध्ये असुनही सांभाळता आला नाही, त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल काळजी करण्याचं काही कारण नाही.” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant khaire clarification on statement regarding congress mla spb