औरंगाबादमधील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आगामी मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शक्तिप्रदर्शन केलं. यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार हल्ला चढवला. “दोन भावी मंत्री मंत्रीपदासाठी शक्तिप्रदर्शन करत आहेत. मात्र, त्या दोघांपैकी कुणालाही मंत्रीपद मिळणार नाही,” असं मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं. तसेच ज्यांनी शिवसेना प्रमुखांना सोडलं, मातोश्रीला सोडलं, त्यांचे हाल खूप वाईट होतात, असा सूचक इशाराही दिला. ते गुरुवारी (१४ जुलै) औरंगाबादमध्ये बोलत होते.
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, “औरंगाबादमधील बंडखोर आमदारांचं मुंबईत शक्तिप्रदर्शन म्हणजे दोन भावी मंत्र्यांची मंत्रीपदासाठीची स्पर्धा आहे. हे दोन भावी मंत्री म्हणजे अब्दुल सत्तार व संजय शिरसाठ. या दोघांमध्ये स्पर्धा सुरू असल्याने दोघेही मंत्री होणार नाहीत. कारण यावर सर्व भाजपाचं नियंत्रण आहे.”
“ज्यांचे आमदार जास्त त्यांना अधिक मंत्रीपदं मिळतील”
“भाजपाचे ११६ आमदार आहेत, तर शिंदे गटाचे केवळ ५० आमदार आहेत. ज्यांचे आमदार जास्त त्यांना अधिक मंत्रीपदं मिळतील. त्यामुळे भाजपालाच जास्त मंत्रीपदं मिळतील. संभाजीनगरवर सर्वांचंच लक्ष आहे. मागे राज ठाकरे आले, एआयएमआयएम पक्ष आला. जो उठला तो संभाजीनगरला येत आहे. मात्र, संभाजीनगर केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे,” असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.
“हे लटकतील, पण भाजपा यांना कधीच मंत्री करणार नाही”
चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले, “या शिवसेनेतून जे फुटून गेले त्यांचं कधीच भलं होणार नाही. हे लटकतील, पण भाजपा यांना कधीच मंत्री करणार नाही. पालकमंत्री करायचा ठरला तर तो भाजपाच होईल, इतर कुणाचा होणार नाही. भाजपा ही संधी सोडणार नाही. बंडखोर गटाकडून तीन-तीन मंत्री होणारच नाही.”
हेही वाचा : “ज्यांना एकनाथ शिंदेंचा फोन आला…”, मंत्रीपदाबाबत बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचं सूचक विधान!
“ज्यांनी शिवसेना प्रमुखांना सोडलं त्यांचे हाल खूप वाईट होतात”
“भाजपात कुणी म्हणतं का की मला मंत्रीपद पाहिजे. तसं भाजपात होत नाही, तेथे वरून जो आदेश येतो तसंच केलं जातं. त्यामुळे बंडखोरांकडून मंत्रीपदासाठी शक्तिप्रदर्शन करणं हास्यास्पद प्रकार आहे. ज्यांनी शिवसेना प्रमुखांना सोडलं, ज्यांनी मातोश्रीला सोडलं त्यांचे हाल खूप वाईट होतात,” असा सूचक इशाराही खैरेंनी बंडखोरांना दिला.