Chandrakant Khaire Chhatrapati Shivaji Maharaj : “देशात कुठेही महापुरुषांच्या पुतळ्यांची तोडफोड केली तर त्या भागात दंगली होतात. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका मोठा पुतळा कोसळला आहे आणि आम्ही या सरकारच्या विरोधात बोलायचंसुद्धा नाही का?” असा प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे. आठ महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा कोसळला. हे पाहून महाराष्ट्र हळहळला, तसेच शिवप्रेमींमधून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध म्हणून मुंबईत महाविकास आघाडीने आज (१ सप्टेंबर) ‘जोडे मारो’ आंदोलन केलं. महाविकास आघाडी या प्रकरणी आक्रमक झाली आहे. तर पोलिसांनी ठिकठिकाणी हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला. यावर, तुरुंगात टाकलं तरीही चालेल पण आंदोलन होणारच असा पवित्रा महाविकास आघाडीने घेतला आहे. अशातच माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, किंवा इतर कोणत्याही महापुरुषाचा पुतळा असेल, त्या पुतळ्याची कोणी तोडफोड केली तर दंगली होतात. अख्खी गावं पेटवली जातात. सिंधुदुर्गमध्ये तर भला मोठा पुतळा कोसळला आहे आणि या सरकारविरोधात कोणी काहीच बोलत नाही. आम्ही देखील सरकारविरोधात बोलू नये असं वाटतं का? उलट हे सरकार पदच्युत झालं पाहिजे. त्यांना याची शिक्षा मिळाली पाहिजे. अशा पद्धतीने कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis : “…उद्धव ठाकरे, शरद पवार काँग्रेसला माफी मागायला लावणार का?” फडणवीसांनी सांगितल्या ७० वर्षांतील तीन घटना
दंगली व्हायला पाहिजेत : चंद्रकांत खैरे
चंद्रकांत खैरे एबीपी माझाशी बोलत असताना म्हणाले, कुठल्याही गावात एखाद्या महापुरुषाचा पुतळा असेल आणि त्या पुतळ्याला कोणी धक्का लावला तर तिथे मोठ्या दंगली होतात. आज इतका मोठा प्रकार घडला आहे आणि मला एक कळत नाही की या घटनेनंतर महायुती सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत? त्या झाल्या पाहिजेत. आज महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडी म्हणून आंदोलन करत आहोत. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुती सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करत आहोत. आम्हाला रोखलं तरी आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार. कितीही पोलीस आले तरी आम्ही मागे हटणार नाही. कारण आम्हाला या गोष्टींची सवय झाली आहे. आम्ही कित्येक वर्षांपासून राजकारणात, समाजकारणात सक्रिय आहोत. आता आम्ही मागे हटणार नाही.