शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. येथे ठाकरे गटाने ‘शिवसंकल्प निर्धार मेळाव्या’चं आयोजन केलं आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला. दरम्यान, भाजपाचे स्थानिक नेते आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मात्र ठाकरे गटाचे स्थानिक नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे या पक्षप्रवेशावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, खैरे यांनी स्वतः यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रकांत खैरे म्हणाले, “राजू शिंदे यांना आम्ही आधीच सांगितलं होतं की तुम्हाला आमच्या पक्षात यायचं असेल तर लवकर या. लोकसभा निवडणुकीच्या आधी या. परंतु, ते लोकसभा निवडणुकीच्या काळात तिकडेच थांबले. निवडणुकीनंतर त्यांनी एक वक्तव्य केलं की महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांना त्यांच्यामुळे २५,००० मतं अधिक मिळाली. त्यांनी भुमरेंना मतं मिळवून दिली. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांनी मला लोकसभा निवडणुकीत पाडलं. आता उद्धव ठाकरे हे राजू शिंदे यांना आपल्या पक्षात घेत आहेत. त्यावर माझी हरकत नाही, कारण आम्ही उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाबरोबर आहोत. परंतु, कुठलाही नवा माणूस कार्यकर्त्यांच्या मनात रुजवणं अवघड असतं. बाहेरचा माणूस आणायचा आणि कार्यकर्त्यांच्या मनात त्याला स्थान मिळवून द्यायचं हे सोपं नसतं. उद्धव ठाकरेंच्या इच्छेमुळे आम्ही हे सगळं सहन करू. राजू शिंदेंमुळे माझा मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे.”

शिवसेनेच्या ठाकरे गटातील माजी खासदार म्हणाले, “राजू शिंदे यांनी आमच्या पक्षाच्या विरोधात जाऊन काम केलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आमच्या विरोधात काम केलं. या आधीच्या निवडणुकीतही त्यांनी आमच्याविरोधात, माझ्याविरोधात काम केलं होतं. त्यांनी खूप वेळा शिवसेनेवर, उद्धव ठाकरे यांच्यावर आणि आमच्यावर टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रेकॉर्ड तपासले तर तिथेही तुम्हाला पाहायला मिळेल की त्यांनी सातत्याने आमच्यावर टीका केली आहे. परंतु, जर माणूस बदलला असेल आणि आता आमच्या पक्षात येत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू.”

हे ही वाचा >> सुप्रिया सुळे अजित पवारांच्या निवासस्थानी, बाहेर आल्यानंतर कारणही सांगितलं; म्हणाल्या, “मी आज..”

चंद्रकांत खैरे यांना प्रश्न विचारण्यात आला की राजू शिंदे यांचं तुमच्या पक्षात येणं तुम्हाला योग्य वाटतं का? यावर खैरे म्हणाले, “पुढचा काळ हा निर्णय योग्य आहे की अयोग्य ते ठरवेल, विधानसभा निवडणुकीला अद्याप तीन-चार महिने बाकी आहेत. कोण येतं, कोण जातं, पुढच्या काही दिवसांत काय होतं हे आपल्याला आगामी काळात समजेल. बऱ्याचदा निवडणुकीचा अर्ज भरण्याची जी अंतिम तारीख असते त्याच्या आदल्या दिवशी एखाद्या उमेदवाराला उमेदवारी मिळते. त्यामुळे येणारा काळ सर्व प्रश्नांची उत्तरं देईल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant khaire not happy as raju shinde joins uddhav thackeray led shiv sena asc
Show comments