Chandrakant Khaire On Ambadas Danve: शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. दोघांकडूनही एकमेकांवर टीका करण्यात येत असल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आता अंबादास दानवे यांनी बोलवलेल्या पक्षाच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरे हे उपस्थित न राहिल्याने पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे.
आपल्याला मेळाव्याला बोलवण्यात आलच नव्हतं, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसेच आपल्याला मेळाव्याला बोलवण्यात आलं नाही, त्यामुळे याबाबत आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. ‘अंबादास दानवे हे स्वत:ला खूप मोठं समजतात. पण त्यांचं पद आणखी दोन ते चार महिनेच आहे. ते फक्त काड्या करतात’, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. यावेळी चंद्रकांत खैरे हे अंबादास दानवे यांच्यावर चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, यावरून छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील वाद विकोपाला गेल्याची चर्चा रंगली आहे.
चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
“मला अंबादास दानवे यांनी मेळाव्याबाबत सांगितलं नाही. मी आता याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहे. अंबादास दानवे हे स्वत:ला खूप मोठं समजतात. मात्र, आता किती आणखी दोन ते चार महिनेच त्यांचं पद आहे, मग त्यांचं पद जाणार आहे. अंबादास दानवे यांच्याबाबत मी तक्रार करणार आहे. परवा आमची बैठक आहे, तेव्हा मी सर्व सांगणार आहे”, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
“तुम्ही आम्हाला काय समजता? कचरा समजता का? शिवसेना मी वाढवली. जेलमध्ये गेलो, लाठ्या खाल्या, काठ्या खाल्या. मग तुम्ही काय केलं? साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही मंत्रिपदापर्यंत पोहोचलो. मग नंतर ते (अंबादास दानवे ) आलेले आहेत. नंतर येऊन काय केलं? फक्त काड्या करण्याचं काम केलं. मला हे अजिबात आवडत नाही. मला पक्षातून कोणी काढू देखील शकत नाही. कारण मी बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे. आंदोलनात माझा सहभाग आहे, माझ्या पक्षासाठी मी काहीही करेन. अंबादास दानवे मला बोलवत नाही. मी माझ्या पद्धतीने करेन, माझं आंदोलन माझ्या पक्षाचं असेल. अंबादास दानवे यांचं आंदोलन असेल, नसेल मला काही माहिती नाही”, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं.
अंबादास दानवे काय म्हणाले?
“चंद्रकांत खैरे हे नागपूरला त्यांच्या समाजाचा मेळावा होता, ते तिकडे गेले होते. आता ते मागच्या काळात माझ्यावर काय-काय बोलले? तरी मी उत्तर दिलं का? उत्तर देणार पण नाही. मी त्यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत टाकलं होतं, पण ते नाही आले. त्याला मी काय करू शकतो?”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.