सरकारमध्ये तिसरा भिडू आला आहे. त्यामुळे काही मंत्र्यांचा शपथविधी राहिला असून, खातेवाटपात गडबड होणार आहे, असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केलं आहे. काहीतरी मोठं कांड होण्याची शक्यता आहे, असं चंद्रकातं खैरे यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
“सरकारमध्ये तिसरा भिडू आला आहे. तसेच, काही मंत्र्यांचा शपथविधी राहिला असून, खातेवाटपात गडबड होणार आहे. त्यामुळे खातेवाटपास थोडा विलंब होत आहे. मात्र, याचा अर्थ खातेवाटपावरून कोणी नाराज नाही आहे. अर्थमंत्रीपदाबाबत वरिष्ठांनी घेतलेला निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल,” असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं होतं.
हेही वाचा : “…अन् त्याचा राग बच्चू कडूंना आला आहे”, ठाकरे गटातील नेत्याचं विधान…
यावर बोलताना चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं की, “अजित पवारांमुळे बाकीच्यांना मंत्रिपद मिळाली नाहीत. आमच्या येथील एक उमेदवार बाशिंग बांधून तयार आहे. पण, त्यांना कोणतीही संधी मिळत नाही. सरकारमध्ये असंतोष खूप वाढत आहे. जास्त दिवस हा असंतोष टिकणार नाही. काहीतरी मोठं कांड होण्याची शक्यता आहे.”
हेही वाचा : “मला तडजोड करावी लागली, तर मी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान
“शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर आहे. जनतेचे प्रश्न खोळंबले आहेत. पाडापाडीचं आणि फोडाफोडीच्या राजकारणाला जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे जनता यांना धडा शिकवेल,” असेही चंद्रकात खैरे म्हणाले.