शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर औरंगाबादमधील सभेमध्ये जाहीर टीका केली. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान युवासेनेच्या सभेमध्ये भाषण करताना चंद्रकांत खैरे यांनी २०१९ साली मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये काय घडलं यासंदर्भातही भाष्य केलं.
नक्की वाचा >> “एका रिक्षावाल्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले?” आदित्य ठाकरे मंचावर असतानाच जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
३० जून रोजी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना भाजपाचे समर्थन देत मुख्यमंत्रीपदी बसवल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी हेच आम्ही अडीच वर्षांपूर्वी म्हणत होतो असं म्हटलं होतं. यामधून भाजपाने काय मिळवलं आपल्याला कळतं नाही असं उद्धव यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. या दोघांनीही अमित शाहांसोबत २०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीचा संदर्भ दिला होता. आता याच बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झालेली यासंदर्भातील माहिती खैरे यांनी जाहीर सभेत दिलीय.
नक्की पाहा >> Photos: एक कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी होणार CM शिंदेंचा सल्लागार?
“मी त्या बैठकीला होता, आदित्य ठाकरे त्या बैठकीला होते. अमित शाह आले तेव्हा आमचं ठरलं की मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घ्यायचं पण उद्धव ठाकरे आधी आम्हाला अडीच वर्ष घ्या असं म्हणाले. त्यावर ते बघू असं म्हणाले. नंतर मग अचानक निरोप आला (भाजपाचा) की आम्हाला पाच वर्ष पाहिजे,” असं मातोश्रीवरील बैठकीसंदर्भात बोलताना खैरे यांनी सांगितलं. खैरे यांचं भाषण सुरु असतानाच आदित्य ठाकरे मंचावर बसले होते. “आता या भाजपावाल्यांना नेमकं किती पाहिजे? सगळी सरकारं पाडण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. त्यामध्ये आपल्याला सुद्धा गोवलं,” असा आरोप खैरेंनी केला.
पाहा व्हिडीओ –
“शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला घडवलं. १९८८ ला बाळासाहेब ठाकरे संभाजीनगरला आणि झंजावात सुरु झाला. कोणाला वाटलं नव्हतं की शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील. ६० पैकी २७ जागा आल्या. आपले महापौर त्यावेळी झाले. शिवसेनाप्रमुखांनी लोकांना महापौर केले, आमदार केले, खासदार केले, मंत्री केले, मुख्यमंत्री केले. त्यांनी काही मागितलं का, नाही. ते म्हणाले मला तुम्ही या पदावर बसावं असं वाटतं. त्यामुळे तुम्ही पदं घ्या. काय उदारमतवादी धोरण होतं त्यांचं. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी ती कमान संभाळली,” असंही खैरे म्हणाले.
नक्की वाचा >> …अन् अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरासमोर आदित्य ठाकरेंचा ताफा थांबला
“आपले नेते उद्धव ठाकरे आहेत. दैवत बाळासाहेब आहेत. आपले युवा नेते आदित्य ठाकरे नेतृत्व करतायत. हेच नकोय भाजपाला. त्यांनी सरकार पाडण्यासाठी काय काय केलंय आपल्याला माहितीय,” असा टोलाही खैरे यांनी लगावला.