काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचं एक शिष्टमंडळ काँग्रेससोबत सत्तास्थापनेचा प्रस्ताव घेऊन आल्याचा गंभीर दावा केला. यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे १५ आमदारांच्या गटासह काँग्रेसमध्ये जाणार होते, असा दावा खैरेंनी केलाय. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच चर्चांना उधाण आलं आहे. खैरे एबीपी माझाशी बोलत होते.
“…तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये यायचं म्हणत मागे लागले होते”
चंद्रकांत खैरे म्हणाले, “हे खरं आहे की, फडणवीस सरकारच्या काळातच एकनाथ शिंदेंसह काही नेते अशोक चव्हाण यांच्याकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव घेऊन गेले होते. एवढंच नाही तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदे आम्हाला काँग्रेसमध्ये यायचं आहे असं म्हणत मागे लागले होते. यावेळी काही लोकही उपस्थित होते. यासाठी त्यांनी खूप पाठपुरावा केला, पण ते शक्य झालं नाही.”
“शिवसेना श्रेष्ठींना कळलं आणि मग शिंदे मागे वळले”
“याबाबत नंतर शिवसेना श्रेष्ठींना कळलं आणि मग ते नंतर मागे वळले. याचा अर्थ हे त्यावेळीही गद्दारी करत होते. ते आज म्हणतात की काँग्रेससोबत गेले, पण ते स्वतः काँग्रेसमध्ये जाणार होते. त्याचं काय? एकनाथ शिंदेंनी देवीच्या साक्षीने काही तरी खरं सांगावं. किती वेळा उद्धव ठाकरे, शिवसेना आणि शिवसैनिकांशी खोट बोलत राहणार आहोत. आई जगदंबा तुम्हाला कधीही माफ करणार नाही,” असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
“त्यांच्या मनात त्यावेळीच गद्दारीचं पाप होतं”
खैर पुढे म्हणाले, “मला एकदा संजय शिरसाट याबाबत म्हणाले होते. त्यावेळी शिंदे आणि शिरसाटांची दोस्ती सुरू झाली होती. तेव्हा शिरसाट म्हणाले होते की, एकनाथ शिंदे यांचं काही खरं नाही. ते कधीही कोठेही जाऊ शकतात. म्हणजे त्यांच्या मनात त्यावेळीच गद्दारीचं पाप होतं.”
हेही वाचा : “रामदास कदमांचा मेंदू सडला आहे की…” उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर चंद्रकांत खैरेंचा संताप
“शिवसेना काँग्रेससोबत गेल्यावर हेही मंत्री होते. सर्वात मोठं खातं यांच्याकडे दिलं होतं. असं असताना ते दोष देतात. तेव्हा त्यांनी काँग्रेससोबत येणार नाही, बाहेर पडतो म्हणत ताबोडतोड निघायला हवं होतं. मात्र, ते असं म्हटले नाही. तेव्हा सत्ता भोगून घेतली,” असंही खैरेंनी नमूद केलं.