“लोकांनी सहकार्य दिलं, म्हणून रुग्णसंख्या कमी झाली. आता १ तारखेनंतर पंतप्रधान, मुख्यमंत्री टीव्हीवर येईन आम्हाला ज्ञान पाजणार असतील, तर कुणीच कुणाचं ऐकणार नाही”, अशी भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मांडली होती. त्यावरून आता शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पलटवार केला आहे. “एक तारखेनंतर तुम्ही जर मुख्यमंत्र्यांचा आदेश डावलला, तर आम्ही रस्त्यावर उतरून तुम्हाला रोखू”, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. राज्यात सध्या १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आला असून त्यानंतर देखील तो वाढवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी लॉकडाउनला विरोध करणारी भूमिका मांडली आहे.
“ते फक्त धमकीच देतात, काही करत नाहीत”
इम्तियाज जलील यांनी केलेल्या विधानाचा चंद्रकांत खैरे यांनी समाचार घेतला आहे. “ही धमकी फक्त धमकी आहे. ते काहीच करत नाहीत आणि ते काही करूही शकत नाहीत. प्रशासन जागृकतेनं काम करत आहे. मुद्दाम दादागिरी करून आपलं वर्चस्व वाढवण्याचा आणि प्रशासनावर दबाव टाकण्याचा हा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला जो आदेश दिला, तो आपण सगळ्यांनी पाळायला हवा. पण इम्तियाज जलील यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं, ते चुकीचं होतं. लॉकडाउन लागू केल्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली आहे. १ तारखेला जर तुम्ही मुख्यमंत्र्यांचा आदेश डावललात, तर आम्ही रस्त्यावर उतरू. तुम्हाला विरोध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.
“मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन ज्ञान पाजळणार असतील तर कोणीही १ जूननंतर ऐकणार नाही”
पंतप्रधानांचंही ऐकणार नाही!
दरम्यान, इम्तियाज जलील यांनी १ जूनपासून लॉकडाउन वाढवल्यास त्याला विरोध करण्याचे संकेत दिले असले, तरी यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. “पंतप्रधानांचं तर आम्ही २०० टक्के ऐकणार नाही. या देशात त्यांचे भक्तही ऐकणार नाही. त्याचं कारण जेव्हा देशात लाखोंच्या संख्येने लोक रडत होते तर आदरणीय पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये जाऊन ‘दीदी ओ दीदी’ असं करत होते. आता लोक त्यांना ‘दादा गप्प बस दादा’..म्हणणार आहेत”, असं जलील म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन; अशी आहे ठाकरे सरकारची योजना
महाराष्ट्रात कधीपर्यंत लॉकडाउन?
येत्या १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात करोनासंदर्भातले कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊनच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. “आपण तयारीचा आढावा घेणार आहोत. जर सर्व गोष्टी सकारात्मक असतील तरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी चर्चा करत निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा विचार करु शकतात”, असं ते म्हणाले. मात्र, “निर्बंध पूर्णपणे उठवले जातील या भ्रमात राहू नका”, असं म्हणत काही प्रमाणात निर्बंध राहणारच असल्याचे देखील संकेत त्यांनी दिले.