शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) घोटाळा झाला असून त्यात अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. सत्ताधारी शिंदे गटातील एका आमदाराचं नाव भ्रष्टाचार प्रकरणात समोर आल्यामुळे त्यावरून मोठी चर्चा सुरू आहे. यावरून शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांना खोचक टोला लगावला आहे. “सत्तारांनी आता शांत राहवं, उगाच बडबड करू नये”, असे ते म्हणाले.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
“टीईटी घोटाळ्यासंदर्भात मी त्यांची आताच मुलाखत पाहिली. त्यांच्या अनेक शाळा आहेत. या घोटाळ्याची चौकशी केंद्रीय अधिकाऱ्यांनी केली आहे. ही चौकशी करतच ते सिल्लोडपर्यंत पोहोचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही शाळा त्यांचीच आहेत. त्यामुळे फक्त त्यांच्याच मुलींचे नावं आहेत, की आणखी मुलींचा समावेश आहे, याची चौकशी व्हायला पाहिजे”, अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. तसेच भष्ट्राचाराचे आरोप असतानाही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्री करण्यात येईल का, असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
हेही वाचा – “माझ्या परिवाराची चूक असेल तर मी गुन्हेगार आहे, नाहीतर…”, टीईटी घोटाळा प्रकरणी अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण!
“सत्तारांनी बडबड करू नये”
“माझ्याकडे एकूण १६ वृत्त पत्र येतात. मी त्यातील कात्रण काढून ठेवत असतो. अब्दुल सत्तारांच्या घोटाळ्याचीही कात्रणे मी काढून ठेवली आहेत. त्याची संपूर्ण फाईल माझ्याकडे आहे. त्यामुळे माझं त्यांना एवढंच सांगणं आहे, की त्यांनी आता उगाच बडबड करू नये. आता त्यांनी शांत राहावं. जे चौकशीत पुढे यायचं ते येईलच”, अशी प्रतिक्रिया चंद्राकांत खैरेंनी दिली आहे.
“अब्दुल सत्तार यांची तक्रार करणारे भरपूर जणं माझ्याकडे येत आहेत. जिल्हा सत्र न्यायालयात त्यांची अनेक प्रकरणं सुरू आहेत. त्यांनी जे शिवसेनेचे कार्यालय बांधले आहेत. ती जागा सुद्धा एका मुस्लीम बांधवाची आहे. ती जागा अब्दुल सत्तार यांनी ताब्यात घेतली आहे. त्या व्यक्तीनेही माझ्याकडे तक्रार दाखल केली आहे. एक बोट दुसऱ्याकडे दाखवलं तर बाकी बोट आपल्याकडे असतात, हे त्यांनी लक्षात ठेवावं”, असंही ते म्हणाले.