मुरुड शहरातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार सुधीर नाझरे यांचे पिताश्री चंद्रकांत गणपत नाझरे यांची ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नाझरे परिवार व आप्तेष्टांतर्फे अमृतमहोत्सवी सोहळा मोठय़ा थाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आगळे-वेगळे महत्त्व असे की, चंद्रकांत नाझरे यांच्या वजनाइतकी कायदेविषयक पुस्तकांची ज्ञानतुला करण्यात येऊन सदरील सर्व कायदेविषयक पुस्तके मुरुड येथील सार्वजनिक वाचनालयांना देण्यात आली. दैनंदिन जीवनात पुस्तकांचे महत्त्व वाढले पाहिजे. वाढत्या महागाईमुळे पुस्तकांच्या किमतीसुद्धा वाढल्या आहेत. अशातच सर्वसामान्य नागरिक पुस्तकापासून दुरावू नये. तसेच कायदेविषयक व महत्त्वाची पुस्तके वाचनालयात त्यांना मोफत वाचता यावीत या उदात्त हेतूने चंद्रकांत नाझरे यांची ज्ञानतुला समाजासाठी आदर्शवत ठरली आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी केलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. या वेळी कलावती नाझरे यांचीसुद्धा तुला करून ती सर्व फळे बालोपासना केंद्रावर वाटप करण्यात आली. या वेळी चंद्रकांत नाझरे यांचा सत्कार नगराध्यक्षा- कल्पना पाटील यांच्या हस्ते करण्यात येऊन शाल-श्रीफळ व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या अभीष्टचिंतन प्रसंगी चिटणीस- स्मिता खेडेकर, उपाध्यक्ष- मंगेश दांडेकर, नगराध्यक्षा कल्पना पाटील, शरद चिटणीस, डॉ. सतीश आवळे, सिद्धेश करंबे आदींची हृदयस्पर्शी भाषणे झाली. या वेळी सुधीर नाझरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, माझा व वडिलांचा संवाद हा गुरु-शिष्याप्रमाणे राहिला. लहानपणीच मला धाडसाने कॅमेरा देऊन माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. सुप्रसिद्ध रंगावलीकार कमलाकर गोंजी, प्रमोद करंदीकर, विरेश वाणी, धनंजय घाग, संदीप जठारी व महेन्द्र पाटील यांच्या रांगोळ्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. श्रीधर साठे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. शिंपी समाजातर्फेसुद्धा नाझरे कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. बहारदार ऑर्केस्ट्राने प्रेक्षकांची चांगली करमणूक केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बाथम यांनी केले. चंद्रकांत नाझरे यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी समाजातील विविध मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Story img Loader