भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसैनिक नव्हते, अशा आशयाचं विधान केलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर ठाकरे गटाने भाजपासह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेब ठाकरेंचा अवमान केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा किंवा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर चंद्रकांत पाटलांनीही पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, “बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्याचा किंवा अयोध्या ही रामजन्मभूमी आहे, हे प्रस्थापित करण्याचं आंदोलन १९८३ मध्ये सुरू झालं. १९८३ मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाची सुरुवात झाली. यामध्ये बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी या संघटनांचाही समावेश होता. बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्याच्या आधी दोन वेळा अशाप्रकारे अयोध्येच्या दिशेनं कूच करण्यात आली होती. ती सदासर्वकाळ विश्व हिंदू परिषदेच्या नावाने झाली. प्रत्यक्ष ढाचा पाडताना तिथे सगळे हिंदू होते. ते सगळे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली होते.
“त्यामुळे अयोध्येतील बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात शिवसेनेचा संबंध नव्हता का? किंवा तिथे शिवसैनिक नव्हते का? तर यामध्ये अनेक मंडळी होती. स्वर्गीय आनंद दिघे यांनी अयोध्या मंदिर बांधण्यासाठी सोन्याची वीट पाठवली होती. होय, बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली, अशी जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी स्वीकारली होतीच. पण मुद्दा असा आहे की, बाबरीचा ढाचा पाडताना तिथे प्रत्यक्ष शिवसैनिक होते का? तर तिथे शिवसैनिक किंवा नॉन शिवसैनिक असं कुणी नव्हतं. ती मशीद प्रामुख्याने हिंदूंनी पाडली. याला विश्व हिंदू परिषदेचं नेतृत्व होतं, हा माझा बोलण्याचा मुद्दा होता. यामध्ये मी चुकूनही बाळासाहेब ठाकरेंचा अनादर करण्याचा मुद्दा नाही,” असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिलं.